ग्रामसेवकांच्या रहिवाशी दाखल्यांबाबत प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: August 11, 2014 22:00 IST2014-08-11T21:27:28+5:302014-08-11T22:00:52+5:30
रवींद्र जोगल : देवगड पंचायत समितीत सभा

ग्रामसेवकांच्या रहिवाशी दाखल्यांबाबत प्रश्नचिन्ह
देवगड : अनेक ग्रामसेवक आपल्या नेमणुकीच्या जागी निवास करीत नाही. त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत कठोर निर्णय घ्यावेत अशी देवगडच्या सर्व पंचायत समिती सदस्यांची एका ठरावाद्वारे एकमुखी मागणी आहे. याबाबत कोणतीही चर्चा किंवा प्रस्तावित कारवाई करण्यात न आल्याने देवगडचे माजी उपसभापती रविंद्र जोगल यांनी संतप्त होत या संदर्भातील समन्वय बैठकीमध्ये गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यासमोर ग्रामसेवकांना मिळालेल्या रहिवाशी दाखल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे केले व दबावाने संबंधित सरपंचांकडून खोटे दाखले मिळविल्याचा थेट आरोपच केला.
यावेळी व्यासपीठावर सभापती सदानंद देसाई, उपसभापती अनघा राणे, माजी सभापती वसंत सरवणकर, माजी उपसभापती रविंद्र जोगल, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनिल तिर्लोटकर, प्रकाश गुरव, हर्षा ठाकूर, सुभाष कोकाटे, संजीवनी बांबुळकर, मनोज सारंग, सहाय्यक गटविकास अधिकारी पंढरीनाथ भाले, ए. व्ही. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये देवगडचे सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची खास समन्वय सभा सोमवारी सकाळी झाली.
यावेळी बहुतांश सरपंचांनी ग्रामसेवकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले. मात्र बापर्डे, दाभोळे, दहिबांव ग्रामपंचायत सरपंच यांनी स्वत:ची बाजू मांडत तक्रारी मांडल्या. बापर्डे सरपंच सुनिल नाईकधुरे यांनी ग्रामसेवकाविरूद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे पूर्वीचे ग्रामसेवक व विद्यमान ग्रामसेवक यांच्यात चार्ज घेण्यावरून विसंवाद असून त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याची बाब स्पष्ट केली. तसेच पाणीपट्टी व पंपाची बिले थकीत असल्याने पाणी वाटपावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याची तक्रार केली. यावर त्वरीत कारवाई करून बिलांची थकबाकी भरण्याचे आदेश सभापतींनी दिले. किंजवडे सरपंचांनी इतिवृत्त वेळेवर लिहून मिळत नसल्याची तक्रार केली. जामसंडे ग्रामपंचायतीने लेखी तक्रारी दिल्याचे स्पष्ट केले. दाभोळे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची चौकशी सूडभावनेतून लावत असल्याची खंत व्यक्त केली. मात्र उर्वरित ७० च्या वर ग्रामपंचायतींनी ग्रामसेवक-सरपंचांमध्ये समन्वय असल्याची भावना व्यक्त केली.
रविंद्र जोगल यांनी सभेचे आयोजन योग्यप्रकारे होत नसून पंचायत समिती सदस्यांची मुख्य तक्रार म्हणजे काही ग्रामसेवक आपल्या नेमणुकीच्या जागी रहात नसल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना संबंधित ग्रामसेवकांनी सरपंचाकडून बनावट व खोटे रहिवाशी दाखले घेऊन प्रश्न दडपण्याचाच प्रयत्न केला असल्याचा आरोप केला. तसेच हा आरोप सिद्ध करून दाखवू असे आव्हानही दिले. यावेळी आरोपांना उत्तर देताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी सर्व कारभार सभापतींच्या मान्यतेनंतरच करत असल्याचा खुलासा दिला. सर्व दाखले नियमानुसारच दिल्याचा दावाही केला. (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यात १९ ग्रामसेवक
देवगड तालुक्यात ७४ ग्रामपंचायतींमध्ये १६ सत्तेवारी ग्रामसेवक असून १ जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर, २ सस्पेंडेड व उर्वरित स्वतंत्र कारभार पहात असल्याची माहिती विजय चव्हाण यांनी दिली.