दोडामार्गमधील विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा घसरला
By Admin | Updated: July 25, 2014 22:52 IST2014-07-25T22:33:18+5:302014-07-25T22:52:00+5:30
जिल्हा परिषदच्या भरारी पथकाकडून तपासणी

दोडामार्गमधील विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा घसरला
कसई दोडामार्ग : जिल्हा परिषद भरारी पथकाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची तपासणी केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणात्मक दर्जा अपेक्षेप्रमाणे आढळला नसल्याचे दिसून आले. मात्र, कुंब्रल शाळा नं. १ मधील विद्यार्थी हुशार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी दिली.
जिल्हा परिषदच्या भरारी पथकाने शाळांच्या तपासणीनंतर येथील पंचायत समितीला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर, महिला व बालविकास सभापती श्रावणी नाईक, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची तपासणी करण्यात आली. यावेळी कुंब्रल शाळा नं. १ वगळता इतर शाळांची प्रगती झालेली नसल्याचे दिसून आले. मुले अभ्यासात हुशार नसून शैक्षणिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी जबाबदारी घेऊन आपला मुलगा शाळेत काय करतो, अभ्यास करतो की नाही, याबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे संदेश सावंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही तपासणी करण्यात आली. तळकट आरोग्य केद्रांमध्ये डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे पत्रकारांनी विचारताच संदेश सावंत यांनी, जिल्ह्यात डॉक्टर येत नाही आणि आले तर राहत नाहीत. याला जबाबदार आपण सर्वजण आहोत, असे त्यांनी सांगितले. भरारी पथकाचा उद्देश शैक्षणिक दर्जा सुधारणे हा आहे. कोणाला त्रास देण्याचा नाही.
ही तपासणी एक दिवसाची नसून एक महिनाभर सुरू राहील. केव्हाही तपासणी करून कामचुकारपणा आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी यावेळी
सांगितले. (वार्ताहर)