नाटळ येथील विहिरीचे शुद्धीकरण

By Admin | Updated: October 8, 2014 00:19 IST2014-10-07T21:49:52+5:302014-10-08T00:19:44+5:30

आरोग्य विभागाकडून दखल : ‘ते’ सांडपाणी नाल्यात सोडले--लोकमतचा प्रभाव

Purification of the wells of Natl | नाटळ येथील विहिरीचे शुद्धीकरण

नाटळ येथील विहिरीचे शुद्धीकरण

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ जाधववाडीतील सार्वजनिक विहिरींमध्ये सांडपाणी जात असल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने दखल घेत विहिरीचे पाणी शुद्धीकरण केले आहे. झिरपून जाणाऱ्या सांडपाण्याला वेगळा मार्ग काढून नाल्यात सोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाने पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाणी शुद्ध केले आहे. ग्रामपंचायतस्तरावर विहिरीची डागडुजी करण्याबाबत सरपंचांनी येथील ग्रामस्थांना ठोस आश्वासन दिले आहे.
जाधववाडी येथील ही सार्वजनिक विहीर पंचवीस वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. सुमारे २०-२५ घरे या विहिरीवरून पाणी भरतात. या विहिरीची डागडुजी करून देण्याबाबत निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंचांनी येथील ग्रामस्थांना दिले आहे. विहिरीच्यानजिक असलेल्या घरमालकांना स्वच्छतेबाबत सरपंच व संबंधित खात्याने सक्त ताकीद दिली आहे.
नाटळ ग्रामपंचायतीच्यावतीने विहिरीच्या आजूबाजूस साचलेला गाळ काढण्यात आला असून विहिरीचा परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे. विहिरीत येणारे सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र व शेण यांचा वेगळा मार्ग काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने आपल्या समस्यांची दखल घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Purification of the wells of Natl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.