हत्याराने मारहाणप्रकरणी तेंडोलीतील दोघांना शिक्षा
By Admin | Updated: February 26, 2015 00:09 IST2015-02-25T23:02:31+5:302015-02-26T00:09:04+5:30
जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

हत्याराने मारहाणप्रकरणी तेंडोलीतील दोघांना शिक्षा
सिंधुदुर्गनगरी : धारदार हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सत्यवान चंद्रकांत परब (वय ३०) व भिकाजी शंकर परब (वय ६२, रा. तेंडोली खरावतेवाडी) यांना जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तर याच प्रकरणी विविध कलमात असलेल्या उर्वरित सहा संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, आरोपींना केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर करत प्रत्येकी पंधरा हजार रूपयांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा मिळाली आहे.तक्रारदार व आरोपी यांच्या वहिवाटीत असणाऱ्या जमीन जागेवरून वाद आहेत. याप्रकरणी दिवाणी दाव्याचे कामकाज सुरू होते. दरम्यान, आरोपी सत्यवान परब याला बांधकामाचे काम करण्यासाठी चिरे टाकायचे होते.
ही बाब तक्रारदार पंढरीनाथ सदाशिव गावडे यांना कळताच त्यांनी सत्यवान याला चिरे टाकू नको म्हणून सांगितले. तरीसुद्धा सत्यवान याने चिरे टाकले. त्यानंतर पंढरीनाथ यांनी चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला वाटेत अडवले व पुन्हा चिरे आणायचे नाहीत, असे बजावले.
यावेळी सदाशिव यांच्यासोबत सुहासिनी सदाशिव गावडे, शुभांगी गावडे, शुभदा गावडे, सदाशिव गावडे आदी उपस्थित होते. त्याच दरम्यान सत्यवान परब, भिकाजी परब, नीलेश भिकाजी परब (वय २६), चंद्रकांत शंकर परब (वय ६५), शालिनी शंकर परब (वय ५४), सुलोचना चंद्रकांत परब (वय ५४), तृप्ती चंद्रकांत परब (वय २५), रेश्मा भिकाजी परब (वय २५, सर्व रा. तेंडोली खरावतेवाडी) आदी त्या ठिकाणी आले व उद्या परत चिरे आणणार, काय ते करा, असे सांगितले. याचे पर्यावसान वादात झाले.
भिकाजी परब याने सदाशिव गावडे यांच्या उजव्या खांद्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. यावेळी पंढरीनाथ सोडवायला गेले असता त्यांच्यावर सत्यवान परब याने चाकूने मानेवर हल्ला केला. नातेवाईकांनीही सोडवायचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंढरीनाथ गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निवती पोलीस ठाण्यात वरील आठही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार १३ एप्रिल २०१० रोजी घडला होता. या प्रकरणात १४ साक्षीदार तपासण्यात
आले. (प्रतिनिधी)