‘जीवन आनंद’ संस्थेला पुलोत्सव पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: October 31, 2014 23:36 IST2014-10-31T23:35:03+5:302014-10-31T23:36:02+5:30

सामाजिक गौरव : आर्ट सर्कलच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

Pulotsav Award for 'Jeevan Anand' Society | ‘जीवन आनंद’ संस्थेला पुलोत्सव पुरस्कार जाहीर

‘जीवन आनंद’ संस्थेला पुलोत्सव पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : पु. लं. देशपांडे आणि त्यांची सहचारिणी सुनीताताई देशपांडे यांच्या दातृत्त्वाचे स्मरण सदैव राहावे, यासाठी देण्यात येणारा पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार यावर्षी मुंबई व सिंधुदुर्ग येथे काम करणाऱ्या ‘जीवन आनंद’ या सेवाभावी संस्थेला आज जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती आर्ट सर्कलतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गेली सहा वर्षे प्रत्येक पुलोत्सवामध्ये निरलसपणे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना गौरविण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपयोग सामाजिक संस्थांच्या हातभाराकरिता व्हावा, यासाठी पुलोत्सवामध्ये हा पुरस्कार दिला जाऊ लागला. यावर्षी ‘जीवन आनंद’ मानकरी ठरला आहे. यावेळी डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या माऊली प्रतिष्ठानकडून १० हजार रूपयांचा वेगळा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मदर तेरेसा यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मानवतेचा ध्यास घेतलेले संदीप परब आणि त्यांचे कार्यकर्ते निराश्रित, मानसिक रूग्ण असणाऱ्या वाटसरूंचा आधार बनले आहेत. मुंबईतील या रूग्णांना आधार देतानाच सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या परब यांना आपल्या ओरोसजवळच्या अणाव गावातील गरजूही आर्त साद घालत होते. त्यातूनच २०११ साली या मंडळींनी अणाव दाबाचीवाडी येथे ‘आनंद आश्रम’ हा पहिला वृद्धाश्रम सुरू केला. हा आश्रम आता ३० वृद्धांचा आधारवड बनलाय. गेल्या चार वर्षात या संस्थेने २३पेक्षा अधिक अनाथांचे अंतिम संस्काराचीही जबाबदारी पेलली. यापाठोपाठ आता ‘संहिता आश्रम’ हा अपंग व मनोरूग्णांसाठी दुसरा उपक्रम सुरू केला आहे. केवळ समाजाच्या दातृत्त्वावर ही संस्था झोकून देऊन निरसलपणे कार्य करीत आहेत. त्यामुळेच हा पुरस्कार संस्थेला जाहीर झाला. सतीश कामत आणि सुहास विध्वंस यांच्या कमिटीने या संस्थेची निवड केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Pulotsav Award for 'Jeevan Anand' Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.