संवादातून जनतेच्या समस्या सोडविणार
By Admin | Updated: November 19, 2014 23:19 IST2014-11-19T23:04:10+5:302014-11-19T23:19:34+5:30
नीतेश राणे : कणकवली मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेट कार्यक्रम

संवादातून जनतेच्या समस्या सोडविणार
कणकवली : प्रत्येक गावाचा विकास करीत असताना संवाद महत्वाचा आहे. जनतेचा विश्वास दृढ केला जात असतानाच संवादाच्या माध्यमातून समस्याही तत्काळ सोडविण्यात येतील. आमदार आणि जनता असा भेद न करता एकाच कुटुंबातील आपण सदस्य आहोत या भावनेतून गावाबरोबरच तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत होऊया, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.
आमदार नीतेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेटीचा कार्यक्रम सुरु केला आहे. बुधवारी खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील तळेरे, साळिस्ते, शिडवणे, वारगाव, कुरंगवणे, शेर्पे या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यापुढे ग्रामस्थांनी कोणत्याही समस्या आपल्यासमोर मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या गावभेट कार्यक्रमाच्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, बाळा जठार, काँग्रेस विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, पंचायत समिती सदस्य भिकाजी कर्ले, सोनाली शिर्सेकर उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, मतदानाच्या माध्यमातून तुम्ही मला आशीर्वाद दिला आहे. तुमच्या गावाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. ती निश्चितपणे पार पाडण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोणती विकासकामे पूर्ण करून हवी आहेत ते मला सांगावे. त्याप्रमाणे अग्रक्रम देऊन विकासकामे पूर्ण केली जातील. संवादाच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडतानाच प्रलंबित असलेल्या कामांची आठवण करून दिल्यास आम्हाला काम करणे सोपे जाईल. एक दुसऱ्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊया. या भागाचा आमदार म्हणून तुमचा माझ्यावर हक्क आहे. त्या हक्कानेच तुम्ही कोणतेही विकासकाम सांगितल्यास ते तत्काळ पूर्ण करण्यात येईल.(वार्ताहर)
खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील गावभेटीदरम्यान आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.