खोट्या माहितीबाबत जनतेच्या मनात चीड

By Admin | Updated: October 1, 2014 00:47 IST2014-10-01T00:45:53+5:302014-10-01T00:47:59+5:30

मतदारांचा अपेक्षाभंग : नीतेश राणे यांचा प्रमोद जठार यांच्यावर आरोप

Public awareness of false information | खोट्या माहितीबाबत जनतेच्या मनात चीड

खोट्या माहितीबाबत जनतेच्या मनात चीड

कणकवली : प्रस्थापित आमदारांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कोणतेही विकासकाम केले नाही. त्यांनी छापलेले प्रगतीपुस्तकच सध्या आमच्यासाठी प्रचाराचा प्रमुख मुद्दा असून प्रगतीपुस्तकातील कामे हा निव्वळ खोटारडेपणा आहे. गावागावात आम्ही भेटल्यानंतर लोकच सांगत आहेत की सन २00९ च्या निवडणुकीपूर्वी या आमदारांना कुठेतरी पाहिले होते, ते आता पुन्हा उमेदवार म्हणून समोर येत आहेत. त्यामुळे खोटी माहिती प्रगती पुस्तकात छापल्याबद्धल जनतेच्या मनात चीड आहे. तो राग जनता मतपेटीतूनच दाखवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यात प्रचाराचा पहिला टप्पा नीतेश राणे यांनी पूर्ण केला. त्यानिमित्ताने ‘लोकमत’संवाद साधताना नीतेश राणे म्हणाले, निवडणूक ही लोकांचा विश्वास मिळविण्याची प्रक्रिया आहे. पाच वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून मोठी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावयाची असते. मात्र, विद्यमान आमदार त्यामध्ये फेल झाले आहेत. सामान्य मतदारांचा यामुळे मोठा अपेक्षाभंग झाला आहे.
ज्या उमेदीने २00९ साली आमदारांना निवडून दिले त्याच्या एक टक्काही विकासकामांबाबतची अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना सामान्य मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे कुठल्याही पोपटपंचीला बळी न पडण्याचा निर्णय जनतेने घेतल्याचे त्यांच्याशी भेटल्यावर जाणवत आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणारा, हक्काचा, कोणत्याही क्षणी भेटणारा व विकास करून घेणारा आमदार निवडून देण्याची भावना लोकांमध्ये आहे.
या निवडणुकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांसहीत पक्षाच्या सामान्य बुथ अध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्याला तेवढेच महत्त्व दिले जात आहे. आपली रणनिती ठरविताना त्या कार्यकर्त्याला विश्वासात घेण्यात आले आहे. त्यामुळे तो आपल्या विजयासाठी ते १00 टक्के मेहनत करताना दिसत आहे. तसेच या कार्यकर्त्यांचा यावेळी नारायण राणेंशी थेट संपर्कदेखील असल्याने यावेळी इतर निवडणुकांपेक्षा वेगळे निर्णय दिसतील.
सन २0१९ साली मी माझे प्रगती पुस्तक काढेन तेव्हा जनतेला चीड नाही तर अभिमान वाटेल की, दिलेला प्रत्येक शब्द आपल्या हक्काच्या आमदाराने पाळला आहे. असे चित्र मी घडवून दाखविन, असे आवाहन आपण जनतेला करत आहे. या आवाहनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Public awareness of false information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.