तरंदळे प्रकल्पासाठी ४ कोटींची तरतूद
By Admin | Updated: September 11, 2014 00:00 IST2014-09-10T22:26:29+5:302014-09-11T00:00:34+5:30
संदेश पारकर : पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रयत्न

तरंदळे प्रकल्पासाठी ४ कोटींची तरतूद
कणकवली : तरंदळे लघुपाटबंधारे प्रकल्पावर डाव्या कालव्याच्या ठिकाणी हायडेन्सीटी पॉलिथिलीन पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून या पाईपलाईनचा प्रयोग करण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील तरंदळे लघुपाटबंधारे प्रकल्प, घोणसरी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, शिवडाव लघुपाटबंधारे प्रकल्पासह अन्य प्रकल्पांना संदेश पारकर यांनी मंगळवारी भेट दिली. तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामाच्या नियोजनाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आंबडपाल येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, उपविभागीय अभियंता व्ही. के. राठोड, शाखा अभियंता रवी माणगावकर, अवधूत मालणकर, डॉ. सत्यवान सावंत, महेश सावंत आदी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर संदेश पारकर म्हणाले, तरंदळे लघुपाटबंधारे प्रकल्पावर सुमारे ८० कोटी रूपये निधी खर्च झाला आहे. या धरणामध्ये सध्या ४.८३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात आला आहे. या पाण्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच कालव्यांसाठी भूसंपादन करावे लागू नये यासाठी पाटबंधारे खात्याने या प्रकल्पावर डाव्या कालव्याच्या ठिकाणी कालव्याऐवजी हायडेन्सीटी पॉलिथिलीन पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात दीडशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे काम जून २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे. तरंदळे येथे डाव्या कालव्याऐवजी टाकण्यात येणारी पाईपलाईन शेतकऱ्यांना सोयीची ठरणार आहे. नळ योजनेच्या धर्तीवरच त्याला वॉल्व्ह असणार आहे. तीन ते चार हेक्टर क्षेत्रावर ग्रुप करून हे पाणी पुरवले जाणार असून सुमारे ५ हॉर्सपॉवरची मोटर पाणी खेचेल एवढ्या पाण्याचा विसर्ग या पाईपलाईनद्वारे होणार असल्याचेही पारकर यांनी
सांगितले. (वार्ताहर)