यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देणार
By Admin | Updated: November 22, 2014 00:15 IST2014-11-21T22:41:38+5:302014-11-22T00:15:31+5:30
शेतकऱ्यांना आवाहन : पॉवर ट्रिलर, मळणी यंत्र

यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देणार
ओरोस : कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाचा वापर लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलर व रोटरी ट्रिलर, मळणी यंत्र, यांत्रिक अवजारांना २५ ते ३५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याचा फायदा मागासवर्गीय व अन्य शेतकऱ्यांना होणार आहे.
राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारीत आहे. शेतीकामासाठी मजुरांची कमतरता, मजुरीवरील जादा खर्च यामुळे शेतीवर सुधारीत कृषी अवजारे, उपकरणे, सयंत्रांचा वापर अनिवार्य झाला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे शेती मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या पर्यायाने पिकांचा उत्पादन खर्चही वाढतो. या बाबीचा विचार करून कृषी क्षेत्राचा दर्जा वापर वाढविण्याच्यादृष्टीने कृषी यांत्रिकीकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र पुरस्कार, राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी अभियांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सन २०१४-१५चा आर्थिक वर्षात राबविण्यात येणारे हे अभियान कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत कृषी यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या बाबीसह शासनाने मान्यता दिली असून योजनेच्या सनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या उपअभियानात ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, रोटरी ट्रिलर, युरिया ब्रिकेट्स, अॅप्लीकेटर, स्वयंचलित भातमळणी यंत्र, फळ तोडणे यंत्र, झाडाचा आकार मर्यादीत ठेवण्याकरिता प्रुनर हार्वेस्टर ट्रॅक्टर पॉवर, ट्रिलरवर चालणारी विविध अवजारे, मळणी यंत्र, ब्रश कटर, चाकू कटर, सोलणी व फोडणी यंत्र आदी विविध अवजारांचा समावेश आहे. ही अवजारे २५ ते ३० टक्केपर्यंत प्रवर्गानुसार अनुदान वितरीत होणार आहे.
यामध्ये १ लाख रूपये अनुसूचित जातीसाठी, ट्रॅक्टर ७५ हजार रूपये सर्वसाधारण, भातकापणी यंत्र अनुसूचितसाठी ९४ टक्के तर सर्वसाधारण ७५ टक्के यासह त्या त्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. कोणास याचा लाभ घ्यायचा असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दोन प्रतीत अर्ज करावा व कागदपत्रांची पूर्तता करावी. (वार्ताहर)