पाणी योजनेसाठी साडेअकरा लाखांचा प्रस्ताव
By Admin | Updated: January 7, 2015 00:01 IST2015-01-06T22:14:52+5:302015-01-07T00:01:03+5:30
दलित सुधार योजना : चिपळूण पालिकेकडून प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे

पाणी योजनेसाठी साडेअकरा लाखांचा प्रस्ताव
चिपळूण : शहरातील पाग-बौद्धवाडी व जिद्द मागासवर्गीय सोसायटीसाठी दलित सुधार योजनेतून स्वतंत्र नळपाणी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ११ लाख ६५ हजार ४५६ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या योजनेचे काम सुरु होणार आहे. चिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे शहर व परिसराला पाणीपुरवठा केला जातो. सुधारित नळपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, ही योजना जानेवारी अखेर कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.खेर्डी पंप हाऊस येथून जिद्द मागासवर्गीय सोसायटी व पाग - बौद्धवाडीला सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. मागासवर्गीय वस्तीला २४ तास पाणी मिळावे, याअनुषंगाने माजी नगरसेविका उज्ज्वला जाधव यांच्या प्रयत्नाने दलित सुधार योजनेअंतर्गत स्वतंत्र पाणी योजनेचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही योजना कार्यान्वित होण्यास विलंब झाला.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत दलित सुधार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवर चर्चा झाली. नव्याने हा प्रस्ताव सादर करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार ११ लाख ६५ हजार ४५६ रुपयांचे नवीन अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून, अंतिम मंजुरीसाठी या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.चिपळूण पालिकेला पाणी योजनेबाबतचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागरिकांची पाणीटंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता होणार आहे. प्रस्तावाचा हा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर जिल्हाधिकारी काय निर्णय देणार? याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
सात सदस्यांची समिती
योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी ७ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये उपनगराध्यक्ष लियाकत शाह, नगरसेविका तेजश्री सकपाळ, माजी नगरसेविका उज्ज्वला जाधव, रमाकांत सकपाळ, राजू जाधव, रमेश चिपळूणकर, प्रियांका कदम यांचा समावेश आहे.
२४ तास पाणीपुरवठा होणार
प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रियेद्वारे नळपाणी योजनेबाबत कार्यवाही केली जाणार आहे. या योजनेसाठी जिद्द सोसायटी येथे स्वतंत्र साठवण टाकी बांधली जाणार आहे. या टाकीद्वारे जिद्द सोसायटी व पाग -बौद्धवाडी यांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.