प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरुच

By Admin | Updated: October 5, 2015 00:07 IST2015-10-04T21:59:20+5:302015-10-05T00:07:49+5:30

गडनदी प्रकल्प : पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

The project's trail starts | प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरुच

प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरुच

सुभाष कदम- चिपळूण --सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजीवली, रातांबी, कुटगिरी- येडगेवाडी येथे पाटबंधारे खात्यातर्फे गडनदी प्रकल्प उभारण्यात आला. परंतु, येथील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना रस्त्याअभावी एस. टी. बस बंद पडल्याने १२ कि. मी.ची पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागण्यांकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त आपला घर संसार, सामानसुमान घेऊन पाटबंधारे कार्यालयात संसार थाटणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे खाते, उपविभागीय अधिकारी, चिपळूण व संगमेश्वर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना ठिय्या आंदोलनाबाबत नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसमध्ये आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचण्यात आला आहे. गडनदी प्रकल्प येण्यापूर्वी कुटगिरी येडगेवाडीचा रस्ता हा नदीतून जात होता.
धरण क्षेत्रात राजीवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत ९ वाड्यांचा समावेश आहे. धरणक्षेत्रात येणाऱ्या ७ वाड्यांचे पुनर्वसन धरणालगतच करण्यात आले. कुटगिरी - बौद्धवाडीचे पुनर्वसन खेरशेत(चिपळूण) येथे करण्यात आले. शिर्केवाडी व घाडगेवाडी शासकीय पुनर्वसन गावठाणे येथे करण्यात आले. कदमवाडी, निकमवाडी व राजीवली- बौद्धवाडी यांनी स्वेच्छा पुनर्वसन करुन धरणाशेजारीच आपल्या जमिनीत राहण्याचा निर्णय घेतला. पाटबंधारे खात्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे रातांबी आणि राजिवली - काळंबेवाडी यांच्या पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे.
या सर्व वाड्या धरणाच्या उजव्या बाजूला एकाच मार्गावर प्रस्थापित झाल्या तर येडगेवाडीचे पुनर्वसन न करता या वाडीला नागरी सुविधा देण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संतोषकुमार यांनी मान्य केले होते. त्याला अनुसरुन प्रशासनाने संयुक्त पुनर्वसन गावठाणे रिंगरोडने जोडण्यासाठी १५ कि. मी. चा रिंगरोड तयार करण्याचे निश्चित झाले. सन २००५मध्ये या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाला चालढकल सुरु आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याने प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत.
वारंवार केलेल्या मागणीनंतर १० कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. परंतु, हे कामही निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून प्रयत्न केले. प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने ३ कि. मी. पैकी ६३० मीटर बी. बी. एम.चे काम झाले. उर्वरीत काम अपूर्ण असल्याने या मार्गावरील एस. टी. बस बंद झाल्याने आता प्रकल्पग्रस्तांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आंदालनाचा इशारा दिला आहे.

कार्यालयातच ठिय्या आंदोलन करणार
गड प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलने केली.
पावसाळ्याच्या तोंडावर केवळ ३ कि.मी.पैकी ६३० मीटर रस्ता डांबरीकरण करुन केली बोळवण.
पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभाराचा रातांबी व राजीवली ग्रामस्थांना फटका.
रस्ता नादुरुस्त असल्याने येडगेवाडी एस. टी. सेवा बंद.
आता घरसंसार घेऊन पाटबंधारेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करुन तेथे संसार मांडण्याचा ग्रामस्थांचा निर्धार.
पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंतांसह उपविभागीय अधिकारी , पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनाही दिली नोटीस.

Web Title: The project's trail starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.