प्रकल्पग्रस्तांचे पैसे जूनमध्ये मिळणार
By Admin | Updated: May 26, 2015 00:53 IST2015-05-25T23:41:01+5:302015-05-26T00:53:17+5:30
राजन तेली : तिलारीबाबतचे वनटाईम सेटलमेंट

प्रकल्पग्रस्तांचे पैसे जूनमध्ये मिळणार
सावंतवाडी : तिलारी प्रकल्पग्रस्तांना वनटाईम सेटलमेंटचे पैसे तातडीने मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पोहोचला असून, यावर ३० जूनपर्यंत निर्णय होऊन प्रकल्पग्रस्तांचे धनादेशही त्यांच्या हातात पडणार आहेत. याबाबतची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी दिली.तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तत्कालीन आघाडी सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नव्हते. गोवा सरकारने आपली रक्कम महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केली. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या अटी व शर्थींमुळे उर्वरित रक्कम वर्ग करता आली नाही. अनेक वेळा तिलारी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. तसेच कालव्याचे पाणीही अडवले. याची दखल तत्कालीन काँग्रेस सरकारने हवी तशी घेतली नाही. अखेर अलिकडेच तिलारी प्रकल्पग्रस्तांनी या प्रश्नावरून पुन्हा आंदोलन केले. त्यानंतर प्रश्नाला वेग आला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बैठक झाली.
या बैठकीत तातडीेने महाराष्ट्र सरकार हे पैसे प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात वर्ग करेल, असे आश्वासन देण्यात आले असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावावर पैसे देण्याविषयी सहमती दर्शवत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.
मुख्यमंत्र्यानी यावर सकारात्मक विचार केल्यास १५ ते ३० जूनपर्यंत हे पैसे प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता माजी आमदार राजन तेली यांनी बोलून दाखवली आहे. (प्रतिनिधी)