चिपी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त
By Admin | Updated: November 23, 2014 23:58 IST2014-11-23T22:33:46+5:302014-11-23T23:58:51+5:30
उद्धव ठाकरेंचा जिल्हा दौरा : विविध समस्यांबाबत ग्रामस्थांचे निवेदन

चिपी विमानतळामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त
कुडाळ : चिपी विमानतळामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्या, प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. उच्च तीव्रतेच्या भूसुरूंग स्फोटांमुळे येथील अनेक घरांना तडे जाऊन ग्रामस्थांची नुकसानी झाली असल्याची माहिती चिपी येथील प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत त्यांचे लक्ष वेधले. खासदार विनायक राऊत यांनीही विमानतळाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती दिली.
दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परुळे-चिपी येथील ग्रीन फिल्ड विमानतळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, बेस्टचे अध्यक्ष अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना येथील विमानतळाच्या संदर्भात माहिती दिली. येथील जनतेच्या जमिनी विमानतळाच्या नावाखाली पेन्सिल नोंदी टाकून घेतल्या गेल्या. परवानगी नसतानाही अती तीव्रतेचे भूसुरूंग स्फोट घडविण्यात आले. त्यामुळे येथील घरांना भेगा पडल्या, घरे मोडकळीस आली आदी जनतेच्या समस्या खासदार राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केल्या.
यावेळी विमानतळाचे बांधकाम करणाऱ्या आयआरबी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे, जनसंपर्क अधिकारी सुभाष पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जयंत डांगरे यांनी विमानतळाचे काम डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दिली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विमानतळाची पाहणी केली. तसेच जनतेच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्यावतीने उद्धव ठाकरे यांना विविध समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सचिन देसाई, प्रकाश परब, सुरेश नाईक, अजित सावंत, दीपक राऊत, भूमी बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रवर्धन आळवे, विनायक केरकर, सुरेश नाईक, अन्य
प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुसज्ज हॉस्पिटलसाठी प्रयत्न करा : ठाकरे
भोगवे येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले असता भोगवेवासीयांनी जिल्ह्यात सुसज्ज, अद्ययावत साधन सामग्री असलेले रुग्णालय नसल्याने जिल्हावासीयांची गैरसोय होत असून गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागत असल्याबाबत ठाकरे यांचे लक्ष वेधत जिल्ह्यात सुसज्ज हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी केली. जिल्ह्यात सुसज्ज हॉस्पिटल होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी सूचना यावेळी ठाकरे यांनी खासदार राऊत यांना केली.