रॅलीतून नोंदविला निषेध

By Admin | Updated: November 5, 2014 00:04 IST2014-11-04T21:35:31+5:302014-11-05T00:04:35+5:30

जवखेडे हत्याकांड : आरोपींना पकडण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Prohibition reported from the rally | रॅलीतून नोंदविला निषेध

रॅलीतून नोंदविला निषेध

कुडाळ : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावात झालेल्या दलित हत्याकांडाचा कुडाळ तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्यावतीने शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या हत्याकांडातील सर्व आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला लाजविणारे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावातील दलित जाधव कुटुंबियांचे हत्याकांड ठरले आहे. या हत्याकांडाच्या विरोधात निषेध करण्यासाठी व यातील आरोपींना पकडून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी राज्यातील दलित समाजबांधव एक झाले असून ठिकठिकाणी मोर्चे काढून याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. या अनुषंगाने कुडाळ तालुका आरपीआय पक्षाच्यावतीने कुडाळ शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीचे नेतृत्व आरपीआयचे कुडाळ तालुकाध्यक्ष आत्माराम कुडाळकर यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, जिल्हा सचिव सत्यवान साठे, जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार जाधव, माजी पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र कदम, आरपीआय शहराध्यक्ष बाबूराव केळूसकर, विद्याधर कुडाळकर, मिलिंद जाधव, भूषण कुडाळकर, प्रसाद जाधव, सागर कुडाळकर, स्मिता नाईक, बाबा सोनवडेकर, अभय जाधव, भगवान कदम, बाबली जाधव, सहदेव आरोसकर, पी. डी. कदम, दिनेश जाधव, अंकिता जाधव, संतोष सरमळकर व अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी चौक, जिजामाता चौक, पोलीस ठाणे मार्गे प्रांत कार्यालयात दाखल झाली.
दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनीही, या हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला असून यासंदर्भात विधीमंडळात आवाज उठविण्याचे आश्वासन आरपीआयच्या कार्यकर्त्यांना
दिले. (प्रतिनिधी)

मागण्या वरिष्ठांपर्यंत नेण्याचे आश्वासन
यावेळी या मोर्चाला उद्देशून बोलताना मुख्य पदाधिकारी यांनी, महाराष्ट्राचा लौकिक आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडातील आरोपींना फाशी होईपर्यंत ही लढाई अशीच सुरू ठेवावी लागणार असल्याचे सांगितले. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांना निवेदन दिले. या हत्याकांडाचा तपास अत्यंत धिम्या गतीने होत असून तो सीबीआयकडे देण्यात यावा, तपासात हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीखाली कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Prohibition reported from the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.