कणकवलीत मोदी शासनाचा निषेध
By Admin | Updated: May 27, 2015 01:02 IST2015-05-26T23:46:06+5:302015-05-27T01:02:46+5:30
राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन : ‘अच्छे दिन’ची पहिली पुण्यतिथी साजरी

कणकवलीत मोदी शासनाचा निषेध
कणकवली : केंद्रातील मोदी शासनाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या शासनाने गेल्या वर्षभराच्या कालावधीत जनतेचा भ्रमनिरास केला आहे, असा आरोप करीत त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील काँग्रेस कार्यालयासमोर मंगळवारी मोदी शासनाच्या ‘अच्छे दिन’ची पहिली पुण्यतिथी साजरी केली.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपा तसेच त्यांच्या मित्रपक्षांनी मतदारांना विविध आश्वासने दिली होती. सत्तेत आल्यानंतर डिझेल, पेट्रोल, गॅस स्वस्त करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करण्यात येईल. परदेशातील काळा पैसा १०० दिवसात परत आणण्यात येईल, चीनला वठणीवर आणण्यात येईल अशी अनेक आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येवून एक वर्षाचा कालावधी लोटला तरी मोदी शासनाला जनतेला दिलेली वचने पूर्ण करता आलेली नाहीत. असा आरोप करीत जिल्हा काँग्रेसच्यावतीने मोदी शासनाचा प्रतिकात्मक निषेध मंगळवारी करण्यात आला.
यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल, कणकवली उपनगराध्यक्ष समीर नलावडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, चांदजी राणे, संजय मालंडकर, विजय भोगटे, राजेश रावराणे, मिलिंद मेस्त्री, उत्तम सावंत आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मोदी शासनाच्या अच्छे दिनच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून पहिली पुण्यतिथी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यात
आली. (वार्ताहर)