मराठीचे प्राध्यापक वाचत नाहीत
By Admin | Updated: November 30, 2014 00:53 IST2014-11-30T00:52:45+5:302014-11-30T00:53:46+5:30
नागनाथ कोतापल्ले यांची खंत; संमेलनात पुस्तक प्रकाशन उत्साहात

मराठीचे प्राध्यापक वाचत नाहीत
असगोली : गुहागर येथे आज हे पहिले संमेलन असले तरी ‘पुढील काळात दरवर्षी परंपरा म्हणून अशी संमेलने व्हावीत. ग्रंथाच्या पूजेबरोबर ग्रंथाचे वाचन महत्वाचे होत राहिले तर आपला समाज अधिक उन्नत होत राहील. सर्व सुविधा घरी असतात पण पाच पुस्तक अनेकांच्या घरी असतात. याला मराठीचे प्राध्यापकही अपवाद नाहीत, अशी खंत आज ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली.
लेखन करणं हे आपल्या संस्कृतीमधील धर्म आहे. पुस्तक माणसाला चांगला विचार करायला शिकवतात. वाचनामुळे माणसाचे जीवन सौख्यमय होते. माणसाचे माणूसपण शोधणं हे सर्व संस्कृतीचे मुख्य सूत्र आहे. तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा तुमचे समाजात स्थान काय हे महत्वाचे आहे. साहित्य हे माणसाच्या विवेकाला जागे करण्यासाठी निर्माण होते. आज विवेकाचा दिवा विजवायचा याची लढाई चालू आहे. दोन वर्षापूर्वी नरेंद्र दाभोळकरांचा झालेला खून याचे उदाहरण आहे. ज्या नगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले तेथे दलितांचे तुकडे करुन खून होतो, अशी खंतही डॉ. कोतापल्ले यांनी मांडली.
संमेलनाच्या दुपारच्या सत्रात संमेलनाध्यक्ष अशोक बागवे यांच्यासह काही स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव उपस्थित होते.
आजच्या विज्ञान युगात विद्यार्थी तसेच तरुणवर्ग साहित्याकडे आपला रस दाखवताना दिसत नाही. मात्र त्यातूनही इथल्या भागातील काही साहित्यिक तसेच कवींनी आजही साहित्याची ही परंपरा आपल्या पुस्तक लेखनातून व काव्यसंग्रहातून जोपासली आहे. अशाच कवींच्या पुस्तक प्रकाशनाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा.अशोक बागवे यांच्या ‘भास अभास’ या पुस्तकाच्या प्रकाशनासोबत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बागवे यांच्या भास अभास या पुस्तकाचे प्रकाशन अक्षया कळझुणकर हिच्या हस्ते करण्यात आले. वरवेलीतील अंध कवी रामचंद्र शिवराम पवार यांच्या ‘काळोखातला अंधार’ या हस्तलिखिताचे तर शिक्षक अनिल कांबळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘विश्वरत्न भीमराव रामजी आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यिक साहेबराव ठाणगे यांनी अशोक बागवे यांच्या ‘भास-अभास’ काव्यसंग्रहाबद्दल बोलताना ‘कवी जेव्हा बोलतो तेव्हा आपण नुसतं हसायचं... कवी म्हणजे कवी असतो, कवी म्हणजे ताऱ्यांमधला रवी असतो’ ही कविता सादर केली.
सोहळ्याला आमदार भास्कर जाधव यांच्यासह नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे, उपसभापती सुरेश सावंत, तहसीलदार वैशाली पाटील, पद्माकर आरेकर, अशोक बागवे, मराठवाडा युवा संमेलनाच्या कार्यवाह विजया थोरात, मसाप गुहागर शाखेचे अध्यक्ष राजेेंद्र आरेकर, श्रीराम दुर्गे, राष्ट्रपाल सावंत, मामा वैद्य व साहित्य रसिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक़्रमाचे सूत्रसंचालन संजय गमरे यांनी केले. (वार्ताहर)