कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला समस्यांचा विळखा
By Admin | Updated: September 7, 2014 23:19 IST2014-09-07T22:56:59+5:302014-09-07T23:19:24+5:30
कुडाळातील स्थिती : रुग्णसंख्या वाढतेय ; सुविधांची वानवा ; लोकप्रतिनिधींनी गैरसोय दूर करावी

कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला समस्यांचा विळखा
रजनीकांत कदम- कुडाळ -कुडाळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या दरदिवसाला वाढतीच आहे. त्यात अपघात वा मोठी दुर्घटना घडल्यास रुग्णांवर उपचार करणे कठीण होऊन बसते. वाढती रुग्णसंख्या व मर्यादित स्टाफ यामुळे येथील रुग्णांना योग्य सेवासुविधा मिळत नाही. रुग्णालयाच्या इमारतीलाही नाविन्याची गरज असून सेवासुविधांच्या पुरवठ्यासह औषधसाठ्याची उपलब्धता पाहणे आवश्यक आहे. या रुग्णालयालाच समस्यांनी ग्रासलेले असून याकडे शासनाने वा लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
कुडाळ तालुका जिल्ह्यातील मध्यवर्ती व सर्वच क्षेत्रात अग्रेसर तालुका आहे. परंतु, आरोग्य यंत्रणेबाबत मात्र अजूनही बराच पिछाडीवर आहे. आरोग्य सेवासुविधासंदर्भात येथील तालुका ग्रामीण रुग्णालय सर्वात मागे आहे. तालुक्यातील सर्वसाधारण गरीब जनता या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येते. तसेच कुडाळ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील रुग्णांची संख्या जास्त असते. असे असतानाही शासनाने या रुग्णालयाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कित्येक वर्षे येथील कर्मचाऱ्यांची पदे रिक्तच आहेत.
त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक पद सहा वर्षे प्रभारी अधिकाऱ्यांकडेच आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद रिक्त आहे. कार्यालय अधीक्षक पद रिक्त असून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही तीन पदे रिक्त आहेत. मात्र, रुग्णालयातील सात परिचारीकांची पदे भरलेली असल्याने तेवढीच एक बाब रुग्णांना दिलासादायक आहे. कुडाळ रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज असूनही वैद्यकीय अधिकारी भरती करण्याबाबत शासन उदासिन दिसत आहे.
स्त्रिया, बालकांसाठी स्वतंत्र विभाग आवश्यक
रुग्णालयात स्त्रिया आणि बालकांना स्वतंत्र विभाग नसल्याने होणारे हाल पाहता उपजिल्हा रुग्णालयातील एक विभाग येथील रुग्णालयात आणल्यास त्याचा निश्चितच रुग्णांना फायदा होणार आहे. येथील ग्रामीण रुग्णालय मोठे असून सुमारे ७0 ते ८0 खाटा राहू शकतात.
रुग्णालयाला अनुकूल परिसर, मुबलक जागा लाभलेली आहे. स्त्रिया व बालकांसाठी स्वतंत्र विभाग झाल्यास वाहतुकीच्या दृष्टीने गर्भवती व बालकांना फायदेशीर ठरणार आहे. रुग्णालय तालुक्याच्या ठिकाणीच असल्याने इतर सोयीसुविधाही उपलब्ध होतील. या विभागामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याही संख्येत वाढ होऊन त्याचा फायदा रुग्णांना होईल. महत्वाचे म्हणजे गरीब गर्भवती महिलांना होणाऱ्या गैरसोयीसह आर्थिक भुर्दंडही टाळता येणे शक्य आहे.
तालुक्याबाहेरुन येणाऱ्या गरोदर महिलांची मोठी गैरसोय होते. रुग्णालयात तालुका मर्यादित औषध कोटा उपलब्ध असल्याने बाहेरील रुग्णामुळे रुग्णालयावरील भार वाढतो. त्यामुळे लागणारी इंजेक्शने, औषधे ही स्वत:च्याच खर्चातून घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करावी लागणाऱ्या गर्भवतीस इतर रुग्णालयात पाठविणे म्हणजे माता आणि अर्भक या दोघांनाही धोका असतो. त्यामुळे गरीब, सामान्य कुटुंबातील गर्भवती महिलाच येथे प्रसुतीसाठी दाखल होतात. अशा सामान्य गभर्वती महिलांना शस्त्रक्रियेसाठी खासगी अथवा जिल्हा रुग्णालयात पाठविल्यास माता आणि बाळाच्या दृष्टीने योग्य आहे का? खर्चाच्या दृष्टीने परवडणारे आहे का? याचा विचार शासनाने करणे अत्यावश्यक आहे.
जिल्ह्यात कुडाळ तालुका इतर तालुक्यांपेक्षा मोठा असल्याने येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली. मात्र, येथून १२ किलोमीटर अंतरावर जिल्हा रुग्णालय असून उपजिल्हा रुग्णालयापासून १८ किलोमीटर बाहेरच दुसरे उपजिल्हा रुग्णालय होण्यास मान्यता असल्याने कुडाळ रुग्णालयाबाबत दुर्लक्ष करण्यात आले.
गंभीर रुग्णांसह अपघातग्रस्तांचे हाल
तालुक्यातून मुंबई- गोवा महामार्ग जात असल्याने महिन्यातून अनेकवेळा छोटेमोठे अपघात होत असतात. परंतु येथील अल्प वैद्यकीय अधिकारी तसेच सोयीसुविधांच्या अभावामुळे अपघातग्रस्त गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचारच केले जातात आणि गरजेनुसार ओरोस येथील जिल्हा अथवा खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अतिगंभीर रुग्णांवर तातडीने उपचार न झाल्याने दगावल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या मोठ्या अपघातात जखमींची संख्या जास्त असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करतेवेळी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ग्रामस्थांची मदत घ्यावी लागते. अत्यवस्थ रुग्ण अथवा अपघातग्रस्तास हात लावण्यास लोक धजावत नसल्याने अशावेळी तर नातेवाईक अथवा उपस्थितांची तारांबळ उडते.
स्त्रीरोगतज्ज्ञांची आवश्यकता
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञाची नियुक्ती केली. मात्र, आठवड्यातील तीन दिवस कुडाळ, तर तीन दिवस शिरोडा असा पदभार त्यांना दिला आहे. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञ योग्य प्रकारे सेवा देऊ शकत नाहीत. गर्भवतीच्या प्रसुतीदरम्यान कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध असणे गरजेचे आहे. एखादी गरोदर माता प्रसुतीसाठी येथील दवाखान्यात दाखल झाली असेल आणि त्याचवेळी स्त्री रोगतज्ज्ञ शिरोड्यात असले, तर त्या मातेला योग्य प्रकारे सेवा मिळू शकेल काय? असा प्रश्नही पडत आहे. त्यामुळे स्त्री रोगतज्ज्ञ कुडाळ, शिरोडा येथे विभागण्यापेक्षा कायमस्वरूपी फक्त कुडाळसाठीच देणे गरजेचे आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था
कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीला ४० ते ४५ वर्षे झाली आहेत. दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, ही इमारत अद्यापही जीर्ण आहे. या रुग्णालयात फक्त ३० खाटांचीच क्षमता आहे. नवीन अद्ययावत रुग्णालय उभारल्यास ही खाटमर्यादा ७० पर्यंत वाढणार आहे.
चतुर्थ श्रेणी कामगार भरणे आवश्यक
या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मात्र, हे कर्मचारी येथील कामासाठी कमी पडत असून या ठिकाणी परिसर स्वच्छता तसेच अन्य कामांसाठी आणखी तीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरणे आवश्यक आहेत.
शवविच्छेदनगृह मोजतेय शेवटच्या घटका
येथील शवविच्छेदन गृह अक्षरश: मोडकळीस आले असून शेवटच्या घटका मोजत आहे. या गृहामध्ये कोणत्याच सुविधा नाहीत. केवळ शवविच्छेदन करण्यासाठी उघडण्यात आल्यानंतर या शवविच्छेदन गृहाच्या दुरवस्थेबाबत दु:खात असणारे नातेवाईक आवाज उठवित नाहीत.
निवासी वसाहतीतील आठ कुटुंबाना धोका
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासी वसाहतही मोडकळीस आली आहे. या वसाहतीकडे शासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. ही वसाहत पडण्याचा धोका असल्याने वसाहतीतील आठ कुटुंबे भीतीच्या छायेखाली आहेत.
शवविच्छेदनगृह मोजतेय शेवटच्या घटका
येथील शवविच्छेदन गृह अक्षरश: मोडकळीस आले असून शेवटच्या घटका मोजत आहे. या गृहामध्ये कोणत्याच सुविधा नाहीत. केवळ शवविच्छेदन करण्यासाठी उघडण्यात आल्यानंतर या शवविच्छेदन गृहाच्या दुरवस्थेबाबत दु:खात असणारे नातेवाईक आवाज उठवित नाहीत.
निवासी वसाहतीतील आठ कुटुंबाना धोका
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासी वसाहतही मोडकळीस आली आहे. या वसाहतीकडे शासनाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. ही वसाहत पडण्याचा धोका असल्याने वसाहतीतील आठ कुटुंबे भीतीच्या छायेखाली आहेत.