शिरोडा रूग्णालयात समस्या
By Admin | Updated: July 19, 2015 23:43 IST2015-07-19T23:00:28+5:302015-07-19T23:43:17+5:30
सेवा द्या अन्यथा उपोषण : युवक काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा

शिरोडा रूग्णालयात समस्या
शिरोडा : शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असून रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहत आहेत. या रुग्णालयात अनेक आवश्यक सुविधांची कमतरता आहे. या समस्यांची सोडवणूक येत्या पंधरा दिवसांत न झाल्यास १० आॅगस्ट रोजी शिरोडा युवक राष्ट्रीय काँगे्रसने उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे उपोषण करण्याचा इशारा शिरोडा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश परब यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात शिरोडा पंचक्रोशीतील सुमारे दहा ते पंधरा गावातील रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी, विविध चाचण्यांसाठी येत असतात. मात्र, रुग्णालयात बऱ्याच सुविधांची कमतरता असल्याने रुग्णांना गोवा, सावंतवाडी, कुडाळ येथील खासगी रुग्णालयात भरमसाट पैसे मोजून वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात.
या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच अन्य कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या या सर्व समस्यांवर येत्या पंधरा दिवसांत उपाययोजना न केल्यास १० आॅगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा इशारा शिरोडा युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत जिल्हा परिषद आरोग्य सभापती, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वेंगुर्ले तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिली आहे. (प्रतिनिधी)
शवागर नसल्याने गैरसोय
या उपजिल्हा रुग्णालयात शवागरसुद्धा उपलब्ध नसून एखाद्या व्यक्तीचा मृतदेह ठेवण्यासाठीची सोय नसल्याने मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रात्री-अपरात्री दाखल झालेल्या अत्यवस्थ रुग्णांना तातडीचे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. यामध्ये बराच वेळ वाया जाऊन रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होतो.