पर्यटन महोत्सव स्पर्धेच्या विजेत्यांना मिळाली बक्षिसे
By Admin | Updated: June 3, 2015 23:38 IST2015-06-03T22:24:39+5:302015-06-03T23:38:25+5:30
लोकमतचा प्रभाव

पर्यटन महोत्सव स्पर्धेच्या विजेत्यांना मिळाली बक्षिसे
रत्नागिरी : जिल्हा पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना लोकमतच्या वृत्तानंतर अखेर बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. रत्नागिरीत २ ते ४ मे या कालावधीत रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सव २०१५चे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून घोषवाक्ये, लोगो, छायाचित्र व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे महोत्सव सुरू असतानाच वाळूशिल्प, नौकानयन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांना गोगटे - जोगळेकर महाविद्यालय क्रीडांगण येथे महोत्सव सुरू असतानाच प्रातिनिधक स्वरूपाचा बक्षिसाच्या रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बक्षिसाची रक्कम पंधरा ते २० दिवस उलटून गेले तरीही मिळालेली नव्हती. या विजेत्यांच्या मनात बक्षिसांबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बक्षिसाची रक्कम कुठल्याच विजेत्याला मिळाली नसल्याने जिल्हा प्रशासन ही रक्कम देण्यास विसरले की काय, असा सवाल होत होता. (प्रतिनिधी)