आरोंदा जेटी प्रकल्प हा वैयक्तिक तेलींचा
By Admin | Updated: January 7, 2015 23:55 IST2015-01-07T22:32:23+5:302015-01-07T23:55:18+5:30
वैभव नाईक यांचे स्पष्ट मत

आरोंदा जेटी प्रकल्प हा वैयक्तिक तेलींचा
सावंतवाडी : सावंतवाडी- आरोंदा येथे होत असलेला जेटी प्रकल्प शिवसेना- भाजपचा नसून तो वैयक्तिक राजन तेली यांचा आहे. त्यामुळे सर्वपक्षीय जसे गावाच्या बाजूने उभे राहिले, तशी आमची भूमिकाही गावाच्या बाजूची आहे, असे स्पष्ट मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, एकनाथ नारोजी, भाई देऊलकर, शब्बीर मणियार, बबलू मिशाळ उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, जेटीवरून उद्भवलेल्या वादाबाबत शासन स्तरावर निर्णय होईलच, पण आमची भूमिकाही गावाच्या पाठीशी ठामपणे राहण्याची आहे. माजी आमदार परशुराम उपरकर तसेच अन्य पक्षांनी जेटीला विरोध केला, तेव्हाही आम्ही जेटीविरोधातच होतो. त्यामुळे आज आमच्याबद्दल गैरसमज नको. तेव्हाची आणि आजची आमची भूमिका सारखीच आहे. हा प्रकल्प तेली यांचा वैयक्तिक असून प्रकल्पामुळे जर गावाची हानी होत असेल, तर त्यात निश्चित मार्ग काढला जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. नाईक यांची पोलीस ठाण्याला भेटआमदार वैभव नाईक यांनी बुधवारी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांची भेट घेऊन चुकीच्या पद्धतीने आरोपींना अटक करू नका, चौकशी करूनच अटक करा, अशी मागणी केली. यावेळी देसाई यांनी, पूर्ण चौकशी करूनच आरोपींना अटक केली जात आहे, असा खुलासा केला. यावेळी आमदार नाईक यांच्यासोबत आरोंदा येथील काही ग्रामस्थही उपस्थित होते. (प्रतिनिधी)