धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीत
By Admin | Updated: September 30, 2014 00:23 IST2014-09-30T00:19:13+5:302014-09-30T00:23:54+5:30
प्रवीण भोसले : काँग्रेसने तिकीट दिले नाही म्हणून नाराजच

धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीत
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आंबोलीचा घाट दाखवू म्हणणारे, माजी आमदार दीपक केसरकर यांनी अनेकवेळा पवारांचाच आधार घेऊन राजकारण केले आहे. तसेच तिकिट न दिल्याने काँग्रेसवर नाराज असलो तरी धर्मांधशक्तींना रोखण्यासाठीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रवीण भोसले यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, युवक उपाध्यक्ष अबिद नाईक, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, उमेदवार सुरेश दळवी, शिवाजी गवस, युवती अध्यक्ष नेहा परब, जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे, नारायण सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रवीण भोसले म्हणाले, मी काँग्रेसकडे सावंतवाडी मतदार संघात तिकिट मागितले होेते पण माझा विचार करण्यात आला नाही, याचे मला दु:ख झाले असले तरीही कोणावरही रोष नाही. माजी आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षात राहून लोकांची दिशाभूल केली आहे.
दहशतवादाचा बागलबुवा करत लोकांची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकीत हे शक्य नाही. त्यांना जनता योग्यवेळी धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
‘शरद पवार अनेकवेळा आंबोली घाट उतरले’
माजी आमदार दीपक केसरकर म्हणतात की, कोकणी जनता स्वाभिमानी आहे. शरद पवारांना आंबोलीचा घाट दाखवू. पण त्यांना हे पण माहिती असले पाहिजे की, पवार हे अनेक वेळा आंबोली घाट उतरले आणि चढले आहेत. देशाचे राजकारण चालविणाऱ्या पवारांसाठी केसरकर हे शुल्लक असल्याचा टोला दळवी यांनी हाणला.