शासकीय यंत्रणेवर वृत्तपत्रांचा अजूनही दबाव
By Admin | Updated: January 6, 2015 23:58 IST2015-01-06T22:29:19+5:302015-01-06T23:58:13+5:30
राजीव साबडे : जिल्हा पत्रकार संघांच्या पुरस्कारांचे वितरण

शासकीय यंत्रणेवर वृत्तपत्रांचा अजूनही दबाव
कुडाळ : वृत्तपत्रांसमोर आज तंत्रज्ञानासह विविध प्रकारची आव्हाने आहेत. परंतु जोपर्यंत वाचकांचा विश्वास आहे, तोपर्यंत मराठी वृत्तपत्र सृष्टीला धोका नाही. वृत्तपत्र सृष्टीची उर्मी अजूनही टिकून असून शासकीय यंत्रणेवर वृत्तपत्रांचा अजूनही दबाव आहे, असे प्रतिपादन प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ व कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, मुळदे सरपंच शशिकांत पालव, विकास कुडाळकर, रुपेश पावसकर, विनायक राणे, राकेश कांदे, सिद्धेश बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दिलीप हिंदळेकर, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार रवी गावडे, युवा पत्रकार पुरस्कार गिरीश परब यांना, तर जिल्हास्तरीय छायाचित्र पुरस्कार अनिल भिसे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. कुडाळ पत्रकार समितीच्यावतीने जाहीर झालेले व्याधकार पांडुरंग सहस्रबुध्दे, कै. वसंत दळवी ग्रामीण पत्रकार पुरस्कार नरेश बागवे, छायाचित्र पुरस्कार दत्ता देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
व्यासपीठावर आमदार नीतेश राणे यांच्यासह उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सचिव गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर, संजीवनी देसाई, संतोष वायंगणकर, उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी अर्चना माने, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर आदी उपस्थित होते. आमदार नीतेश राणे म्हणाले, समाजातील चुकीच्या घटना खटकतात किंवा चांगल्या घटनेनंंतर प्रबोधन होईल, हे ज्याला समजते, तोच खरा पत्रकार. येथील पत्रकारांमध्ये असलेली एकजूट मुंबईतील पत्रकारांमध्ये दिसत नाही. इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरामुळे अमेरिकेतील वृत्तपत्रे बंद पडत आहेत. याबाबत वेळीच विचारमंथन होणे आवश्यक आहे, अशी राणेंनी व्यक्त केली. गजानन नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकमाच्या सुरुवातीला राज्यस्तरीय नृत्यांगना मृणाल सावंत हिने कथ्थक नृत्य सादर केले. प्रास्ताविक सचिव गणेश जेठे, मान्यवरांची ओळख अशोक करंबेळकर, सूत्रसंचालन नीलेश जोशी, आभार विजय पालकर यांनी
मानले. (प्रतिनिधी)