अध्यक्षपदी संदेश सावंत

By Admin | Updated: September 22, 2014 01:00 IST2014-09-22T00:57:19+5:302014-09-22T01:00:40+5:30

जिल्हा परिषद : निवडीवर सत्ताधारी सदस्य नाराज

Presidency President Sawant | अध्यक्षपदी संदेश सावंत

अध्यक्षपदी संदेश सावंत

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या संदेश सावंत यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या या निवडणुकीवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकत अनुपस्थिती दर्शविली तर सत्ताधारी काही सदस्यांमध्येही धुसफूस सुरु असून सदस्य संग्राम प्रभुगांवकर हे नाराज झाले असून ते राजीनामा देणार असल्याचे समजते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २४ व्या अध्यक्षपदासाठी रविवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. यावेळी नायब तहसीलदार जी. आर. गावीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर आदी उपस्थित होते.
सकाळी ११ ते १ या कालावधीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी केवळ दोनच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. खुटवड यांनी अध्यक्ष म्हणून संदेश सावंत तर उपाध्यक्ष म्हणून रणजित देसाई यांना विजयी म्हणून घोषित केले.
यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, मावळत्या अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, विषय समिती सभापती प्रकाश कवठणकर, भगवान फाटक, अंकुश जाधव, श्रावणी नाईक तसेच मधुसूदन बांदिवडेकर, माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत आदींसह सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
निवडणुकीस
विरोधकांचा बहिष्कार
रविवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेस विरोधी पक्षाच्या एकाही सदस्यांनी उपस्थित न राहता या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या निवडणुकीसाठी रविवारी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमुळे विधानसभा मतदारसंघांना मिळालेल्या प्रतिनिधीत्वामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात नक्कीच फायदा होईल असे सांगतानाच विरोधी किंवा आपल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी नसून जे सदस्य उपस्थित राहिले नाहीत त्यांचे काही धार्मिक कार्यक्रम तसेच वैयक्तिक कामे असल्याने निवडणुकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
- सतीश सावंत,
राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष
संग्राम प्रभूगांवकर यांचा बहिष्कार
रविवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत आपली वर्णी न लागल्याने सत्ताधारी पक्षातील काही सदस्य नाराज झाले आहेत. मालवण तालुक्यातील मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य संग्राम प्रभूगांवकर यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. प्रभूगांवकर हे आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.
४जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेस विरोधी पक्षाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. तसेच सत्ताधारी पक्षाचे संग्राम प्रभुगांवकर, स्नेहलता चोरगे यांच्यासह काही सदस्य अनुपस्थित होते तर संग्राम प्रभुगांवकर हे अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांना पद न मिळाल्याने ते नाराज होऊन निघून गेले व ते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असल्याबाबत सतीश सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, नाराजीचा असा कोणताही प्रश्न नाही. विरोधकांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकलेला नाही तर आपल्या पक्षातील कुणीही नाराज नाही. संग्राम प्रभुगांवकर यांच्या घरी काही धार्मिक कार्यक्रम असल्याने ते परवानगी घेऊन आपल्या घरी गेले आहेत. तसेच इतर सदस्यही आपल्या काही वैयक्तिक कारणामुळे येवू शकले नाहीत. मात्र त्यांनी याबाबत कळविले होते असेही सतीश सावंत यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Presidency President Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.