दर्याचा राजा झालाय मासेमारीसाठी सज्ज
By Admin | Updated: August 1, 2015 00:22 IST2015-07-31T23:29:36+5:302015-08-01T00:22:42+5:30
मोठ्या नौका किनारीच : हवामान बदलाची भीती

दर्याचा राजा झालाय मासेमारीसाठी सज्ज
मालवण : भारताच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीवरील शासनाने लागू केलेला १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी संपल्याने नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा काही मच्छिमारांनी केला आहे, असे असले तरी नारळी पौर्णिमेपर्यंत हवामान बदल होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. समुद्र शांत असल्याने शुक्रवारी अनेक मच्छिमारांनी आपल्या नौका आज समुद्रात लोटत नव्या मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा केला. मात्र, मोठ्या नौका अद्याप किनाऱ्यावरच सुरक्षित ठिकाणी उभ्या आहेत. गेल्या काही वषार्तील मच्छिमारांतील वादाची स्थिती पाहता मत्स्य विभाग, बंदर विभाग सतर्क झाला असून पोलिस प्रशासनानेही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.केंद्र शासनाने राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या २महिन्याच्या कालावधीत मासेमारी बंदी जारी केली होती. ही बंदी आज, ३१ जुलै रोजी संपत आहे. आगामी काळात समुद्रात पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या हंगामात होणाऱ्या वादळी वाऱ्यात नौकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. छोट्या नौका मासेमारी करून तात्काळ किनाऱ्यावर पोहचू शकतात. त्यामुळे किनाऱ्यावर बंदिस्त ठेवलेल्या नौका जागेवरच आहे.
बदलत्या हवामानामुळे आगामी काही दिवस अघोषित मासेमारी बंदी राहणार आहे. मत्स्य विभागानेही आगामी महिनाभराच्या कालावधीत पावसाळी हवामान तसेच वादळी वारे याचा अंदाज घेऊनच मासेमारी करण्याच्या सूचना मच्छिमारांना केल्या आहेत. (वार्ताहर)
अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई व्हावी
मासेमारी बंदी कालावधी संपल्याने पुन्हा गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातील ट्रॉलर्सचा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर हैदोस घालतात. त्यामुळे गतवर्षीसारखे आक्रमण उदभवण्याची शक्यता आहे. स्थानिक व परराज्यातील अनधिकृत मासेमारीवर मत्स्य विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई करावी, अशी मागणी मालवण तालुका श्रमिक संघ, श्रमजीवी रापण संघ यांनी निवेदनाद्वारे मत्स्य विभाग सहाय्यक मत्स्य आयुक्त यांना केली आहे.