प्रशांत म्हापसेकरचे चित्रप्रदर्शन मुंबईत
By Admin | Updated: December 2, 2015 00:43 IST2015-12-01T22:24:56+5:302015-12-02T00:43:58+5:30
शरद पवार, मधु मंगेश कर्णिकांची उपस्थिती

प्रशांत म्हापसेकरचे चित्रप्रदर्शन मुंबईत
कणकवली : येथील प्रतिथयश चित्रकार प्रशांत म्हापसेकर याच्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबई-वरळी येथील नेहरू सेंटर गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. ५ डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची उपस्थिती लाभणार आहे.
वय वाढत जाते तसा आठवणींचा संग्रह वाढत जातो. बऱ्यावाईट, आठवणी साठत जातात. एका कलाकाराला नेहमीच व्यक्त व्हायचे असते. गायक आपल्या गायनातून, शिल्पकार आपल्या शिल्पातून आणि चित्रकार आपल्या चित्रांतून व्यक्त होतो.
चित्रकार हा पेशा म्हणूनही चित्र काढतो जेव्हा तो व्यक्त होतो. तेव्हा त्याच्या मनातील भावभावना, कल्पना कॅनव्हासवर उतरतात. कधी त्या आजूबाजूच्या दुनियेसंबंधी असतील, तर कधी स्वत:बद्दल. प्रत्येकाच्या आयुष्यासंबंधी आठवणींचे एक पुस्तक व्हावे.
या आठवणींना एका शैलीत, एका मालिकेत ब्रशच्या फटकाऱ्याने बांधण्याचा हा प्रयत्न प्रशांतने केला आहे. हे सोलो चित्रप्रदर्शन म्हणजे त्यांच्या स्वत:संबंधी आठवणींचे गाठोडे आहे. गेल्या सात-आठ वर्षांत व्यावसायिक स्तरावर उत्तम तऱ्हेने काम करताना स्वत:च्या अनुभव विश्वाचे गाठोडे सर्वांसमोर रिते करावेसे वाटल्याने ‘आठवणी-रिमेम्ब्रन्स’ हे प्रदर्शन प्रशांत याने आयोजित केले आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी मोफत असून, जास्तीत जास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत याने केले आहे.
ओरोस येथील शरद कृषी भवन प्रशांत याची चित्रे आणि म्यूरल्सनी सजवण्यात आले आहे. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार शाहरूख खान, आमिर खान यांच्यासाठी प्रशांत याने काम केले असून, त्यांच्याकडून प्रशांतच्या कामाचा गौरव झाला आहे.