काथ्या व्यवसायात आर्थिक सक्षमतेची ताकद : एम. बी. चौगुले
By Admin | Updated: January 1, 2015 00:18 IST2014-12-31T21:04:26+5:302015-01-01T00:18:02+5:30
वेंगुर्ल्यात काथ्या उद्योग जागृती प्रशिक्षण सुरू

काथ्या व्यवसायात आर्थिक सक्षमतेची ताकद : एम. बी. चौगुले
वायंगणी : काथ्या व्यवसायापासून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून त्यांचे कुटुंब सक्षम बनविण्याची ताकद असणारा हा व्यवसाय काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेतून अविरतपणे सुरू आहे. याचा आदर्श प्रशिक्षणार्थ्यांनी ठेवून रोजगार निर्मिती करावी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे, असे उद्गार वेंगुर्ले बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रा. एम. बी. चौगुले यांनी काढले.
वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात भारत सरकारच्या सुक्ष्म-अतिसूक्ष्म विभाग क्वॉयर बोर्ड व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काथ्या उद्योग जाणीव जागृती या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. एम. बी. चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी क्वॉयर बोर्डचे फिल्ड आॅफिसर शंकर नारायणन, संस्थेचे मार्गदर्शक एम. के. गावडे, मातोंड माजी उपसरपंच नितीन परब, दोडामार्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदू मुळीक, दीक्षा परब, महिला काथ्याच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, आदी उपस्थित होते.
प्रज्ञा परब यांनी महिलांनी काथ्या व्यवसायातून रोजगार मिळू शकतो, त्याकरिता उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. शंकर नारायणन यांनी आज केरळ राज्य काथ्या व्यवसायातून अर्थव्यवस्था सांभाळते. काथ्यापासून दोरी मॅटबरोबरच अनेक उत्पादने निर्मिती केली जाते. तुम्हाला प्रशिक्षण कर्ज व बाजारपेठ क्वॉयर बोर्डच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. (वार्ताहर)
क्वॉयर बोर्डाच्या या प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थ्यांना काथ्या युनिट दिले जाणार आहे. यातून रोजगार निर्मिती केली जाईल. त्यांनी उत्पादित केलेल्या मालालाही बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय केल्यास निश्चित यशस्वी उद्योजक बनाल.
- एम. के. गावडे ,
मार्गदर्शक, काथ्या कामगार संस्था