विकासाची क्षमता विरोधकांत नाही
By Admin | Updated: August 17, 2014 22:34 IST2014-08-17T21:55:36+5:302014-08-17T22:34:22+5:30
नारायण राणे : वैभववाडीतील कार्यक्रमात टीका

विकासाची क्षमता विरोधकांत नाही
वैभववाडी : जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता विरोधकांमध्ये नाही आणि जठारांमध्ये ती पात्रता नाही हे जनतेला पटवून द्या, असे आवाहन राणे यांनी केले.ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि पंचायत समिती इमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, सभापती नासीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने आदी उपस्थित होते.राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी अच्छे दिन आनेवाले है असे सांगून सत्तेवर येताच महागाईत वाढ करून जनतेला फसविले आहे. जिल्ह्याचा विकास करायला मोदी इथे येणार नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना जनतेने यापुढे बळी पडू नये. लोकसभा निवडणुकीत वैभववाडी तालुक्याने हवी तशी साथ दिली नाही. याचे मला खूप वाईट वाटले. परंतु हे पुन्हा घडणार नाही. याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी.
राणे यांनी आमदार जठार यांचा नामोल्लेख गटार असा करून सगळे मी केले असे म्हणणाऱ्या आमदारांनी काय केले? विकासकामे करण्याची त्यांची पात्रता आहे का? असा सवाल करीत नीतेश राणेंना कणकवलीतून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे वैभववाडी तालुका नावाप्रमाणे वैभवशाली बनविण्यासाठी तालुक्याने संपूर्ण साथ द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले. (प्रतिनिधी)