मडुरा टर्मिनसचा वाद उफाळण्याची शक्यता

By Admin | Updated: January 7, 2015 00:38 IST2015-01-07T00:31:20+5:302015-01-07T00:38:45+5:30

संघर्ष समिती आंदोलनाच्या पवित्र्यात : राणे व केसरकर यांच्यात कलगी-तुरा शक्य

The possibility of settling the issue of the Madura terminus | मडुरा टर्मिनसचा वाद उफाळण्याची शक्यता

मडुरा टर्मिनसचा वाद उफाळण्याची शक्यता

संतोष परब - मडुरा -केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचे टर्मिनस सावंतवाडी येथेच होणार असल्याचे रत्नागिरी येथील कार्यक्रमात जाहीर केल्याने हे टर्मिनस मडुरा येथेच व्हावे, अशी मागणी मडुरावासीयांनी केली आहे.
कोकण रेल्वेच्या टर्मिनस मुद्यावरुन माजी मंत्री नारायण राणे व विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात कलगी-तुरा सर्वश्रृत आहे. या पार्श्वभूमीवर टर्मिनस सावंतवाडीत होण्याचा घाट घालत असल्याने हे टर्मिनस मडुरा येथे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश गावडे यांनी दिल्याने नवा वाद उफाळण्या शक्यता आहे. मडुरा येथे टर्मिनस होण्यासाठी मडुरा दशक्रोशी संघर्ष समितीने केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मडुरा येथेच टर्मिनस होणार असल्याचे जाहीर केले होते. प्रशासनानेही हालचाली सुरु केल्या. काँग्रेसची सत्ता असताना मुंबई येथून तत्कालिन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांना मडुरा येथील टर्मिनस जागेसंदर्भात अहवाल पाठविण्याचा आदेश देण्यात आला होता. टर्मिनस उभारण्यासाठी मडुरा रेल्वेस्थानक परिसरात मुबलक जागा उपलब्ध आहे. तसेच स्थानिक लोकही टर्मिनससाठी कोकण रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. असे असताना मडुरावासीयांच्या मागणीचा विचार न करता टर्मिनस हे सावंतवाडी येथे हलविण्यात येत असल्याने स्थानिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे मडुरा हे शेवटचे स्थानक असल्याने तसेच याठिकाणी जागा उपलब्ध असल्याने मडुरा येथे टर्मिनस व्हावे, अशी अपेक्षा मडुरा दशक्रोशी संघर्ष समितीने केली होती. मात्र सावंतवाडी मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री केसरकर यांनी टर्मिनस होण्यासाठी सावंतवाडी हेच योग्य ठिकाण असल्याचे सांगून सावंतवाडीेला पसंती दिली.

संपादित जमीनी शेतकऱ्यांना परत करा
मडुरा परिसरातील शेतकऱ्यांना मडुरा टर्मिनससाठी भूसंपादन करण्याबाबत दोन वेळा नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल करुन हे टर्मिनस सावंतवाडी येथे हलविल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचा टर्मिनसला विरोध नाही मात्र फसवणूक करुन घेतलेल्या अतिरिक्त संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


टर्मिनस मडुरा येथेच व्हावे
मडुरा येथे टर्मिनस होणार असल्याने या परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आला आहे. याठिकाणी टर्मिनस झाल्यास या परिसराचा कायापालट होणार आहे. या भागाचा सर्वच दृष्टिकोनातून विकास होणार असल्याने टर्मिनस मडुरा येथेच व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले. टर्मिनस सावंतवाडी येथे नेण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा गावडे यांनी दिला. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री गावडे यांची भेट घेऊन मडुरावासीयांचे म्हणणे मांडणार असल्याचे गावडे म्हणाले.

Web Title: The possibility of settling the issue of the Madura terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.