बेपत्ता युवक-युवती पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: May 14, 2014 00:16 IST2014-05-14T00:15:49+5:302014-05-14T00:16:05+5:30
सावंतवाडी : तीन दिवसांपूर्वी सावंतवाडीतील चराठा तसेच बांदा येथून बेपत्ता झालेल्या दोन मुलींपैकी चराठा येथील युवतीला बांदा पोलिसांनी कोल्हापूर

बेपत्ता युवक-युवती पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी : तीन दिवसांपूर्वी सावंतवाडीतील चराठा तसेच बांदा येथून बेपत्ता झालेल्या दोन मुलींपैकी चराठा येथील युवतीला बांदा पोलिसांनी कोल्हापूर येथून सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले, तर बांदा येथील युवती सावंतवाडीतील युवकासह कोल्हापूर येथून पोलिसांचा सुगावा लागताच पसार झाली आहे. बांदा पोलिसांनी संशयित म्हणून सावंतवाडीतील एका युवकाला ताब्यात घेतले आहे. तीन दिवसांपूर्वी सावंतवाडीतील चराठा व बांदा येथील युवती बेपत्ता झाल्या होत्या. या दोघींच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत रितसर तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. गेले दोन दिवस पोलीस मुलींच्या नातेवाइकांसोबत कोल्हापूर व बेळगाव येथे जाऊन तपास करीत होते, पण कोणीही सापडत नव्हते. अखेर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चराठा येथील युवती सावंतवाडीतील एका युवकासोबत कोल्हापूर शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कोल्हापूर गाठले व या दोघांना ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांच्यासोबत असणारा अन्य युवक व युवती तेथून पळ काढण्यात यशस्वी ठरले. बांदा पोलिसांचे पथक या दोघांच्या मागावर आहे. चराठा येथील युवती व या युवकाला घेऊन बांदा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल दत्ता देसाई व प्रसाद कदम हे मंगळवारी सकाळी सावंतवाडीत दाखल झाले. यावेळी पोलिसांनी या युवकाचा भ्रमणध्वनी तपासासाठी घेतला. त्यात अन्य युवकांचे फोन तसेच त्यांच्या सोबत असलेल्या युवकाचे आलेले फोन पोलिसांना मिळाले. (प्रतिनिधी)