निकृष्ट काम करणारे काळ्या यादीत

By Admin | Updated: July 7, 2015 23:15 IST2015-07-07T23:15:10+5:302015-07-07T23:15:10+5:30

वैभव नाईकांचा इशारा : कुडाळची आमसभा खेळीमेळीत, मोठा पोलीस बंदोबस्त

In poor black list | निकृष्ट काम करणारे काळ्या यादीत

निकृष्ट काम करणारे काळ्या यादीत

कुडाळ : तालुक्यातील विकासकामांच्या पूर्णत्वासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करूया, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी आमसभेत बोलताना केले. यापुढे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असून वेळ पडल्यास संंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा यावेळी आमदार नाईक यांनी दिला. आमसभा खेळीमेळीत व शांततेत पार पडली. कुडाळ तालुक्याची आमसभा चार वर्षांनंतर आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित केली होती. आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार नाईक होते तर यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, गटविकास अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, भारती चव्हाण, रुक्मिणी कांदळगावकर, जान्हवी सावंत, पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे, दीपक नारकर, गंगाराम सडवेलकर, परशुराम परब, अतुल बंगे, संतोष कुंभार, जिल्हा नियोजन सदस्य अभय शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, नायब तहसीलदार प्रवीण लोकरे व इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, ग्रामीण भागातील जनतेने तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांची माहिती आमसभेत मांडली. आमसभेच्या उशिरा होण्याबाबत संजय भोगटे यांनी प्रश्न उपस्थित केला. आमसभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई म्हणाले, या अगोदरच्या सभेतील जनतेच्या मागण्या तत्कालीन आमदार नारायण राणे यांनी जवळपास पूर्ण केल्या असून, यापुढेही सध्याचे आमदार येथील जनतेच्या मागण्या पूर्ण करतील, असे सांगत कुडाळातून जाणाऱ्या महामार्गाचा आराखडा संदर्भात कुडाळवासीयांना विश्वासात घ्या. मगच आराखडा तयार करा, असे सांगितले.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, कुडाळ तालुक्यातून कोल्हापूरला जोडणारा घोडगे सोनवडे घाटाचे काम लवकरच सुरू होईल. यापुढे निकृष्ट काम करणाऱ्याला थारा नाही. सभेत केलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या सभेचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. आभार वासुदेव नाईक यांनी
मानले. (प्रतिनिधी)

तालुक्यातील रस्ते गेले वाहून
यावेळी जमलेल्या सर्व जनतेने सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम व पंतप्रधान सडक योजना विभागाच्या गलथान कारभाराला टार्गेट करीत चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करून बांधलेले रस्ते तीन वर्षे सोडाच, दोनच वर्षात वाहून गेले आहेत. संपूर्ण तालुक्यातील बहुतांशी रस्ते वाहून गेलेल्याचे मत व्यक्त केले. तालुक्यातील नेरू र, रायवाडी, गिरगाव, कुसगाव, निरुखे सुतारवाडी, पांग्रड, केसरी, आंजिवडे असे नवीन रस्ते दोन वर्षातच वाहून गेले.
आरोग्य सेवेचे तीनतेरा
कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्गाच्या जवळ असून अत्यंत आवश्यक असलेल्या या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नाहीत. तर हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रातही सोयी सुविधांचा अभाव आहे. रुग्णवाहिका नाही, अशी अवस्था तालुक्यातील इतरही केंद्रांचीही असून याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. भारमान नसले, तरी ‘गाव तिथे एसटी’ या घोषवाक्यानुसार एसटी प्रशासनाने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी बस पाठवावी, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: In poor black list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.