मतदार जागृतीमुळे मतदान वाढणार-प्रसाद उकर्डेे

By Admin | Updated: October 6, 2014 22:29 IST2014-10-06T21:22:41+5:302014-10-06T22:29:05+5:30

निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांना वेग; आता तयारी अंतिम प्रक्रियेची

Polls will increase due to voter awareness - Prasad Ukarde | मतदार जागृतीमुळे मतदान वाढणार-प्रसाद उकर्डेे

मतदार जागृतीमुळे मतदान वाढणार-प्रसाद उकर्डेे

विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी आपला हक्क प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे बजावावा, यासाठी रत्नागिरी मतदार संघात विविध माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. जनतेत आता मतदानाच्या हक्काविषयी प्रबोधन झाल्याने या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी नक्कीच वाढेल, असा आशावाद रत्नागिरी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.  येत्या १५ आॅक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. याअनुषंगाने उकर्डे यांनी या प्रक्रियेदरम्यानच्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, उमेदवार आणि मतदार निश्चिती हा महत्त्वाचा पहिला भाग आता संपला असून, रत्नागिरी मतदारसंघात अंतर्गत व्यवस्थापन हा दुसरा भाग सुरू झाला आहे. त्याअंतर्गत सैन्य दलातील मतदारांना टपाली मतपत्रिका पाठवण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानासाठी मतपत्रिका सुविधा केंद्र शिबिरे घेण्यात येत आहेत. जे पोलीस कर्मचारी दुसऱ्या मतदारसंघात कर्तव्य बजावण्यासाठी जाणार आहेत, त्यांच्यासाठी ४ व ५ रोजी आयोजित केलेल्या मतपत्रिका सुविधा केंद्राद्वारे ५५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिका त्याच दिवशी प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हिडीओग्राफीद्वारे केली जात असल्याची माहिती उकर्डे यांनी दिली.
रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन्ही मतदार संघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. यामध्ये रत्नागिरीतील ३१०, तर संगमेश्वरातील ३१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात एकूण २६ क्षेत्र असून, २९ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची, तर ३७५ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एकूण १ हजार ९०४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी बारा समित्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उकर्डे यांनी दिली.
ते म्हणाले, सध्या मतदार यादी चिन्हांकित प्रत करण्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे काम म्हणजे मशिन सिलिंगचे. नवीन मतदारांची नावे चढविणे, दुरूस्ती आदी कामांचा यात समावेश आहे. ही ‘मशिन सिलिंग प्रक्रिया’ बुधवार, ८ आॅक्टोबरपासून रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथे सुरू होणार आहे, असेही ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा घटक म्हणजे मतदान केंद्रांचे याद्यांसह मशिन तसेच त्या केंद्राकरिता आवश्यक असणारे सर्व विविध प्रकारचे साहित्य. रत्नागिरी मतदार संघात एकूण ३४१ मतदान केंद्र आहेत. केंद्राध्यक्ष आदल्या दिवशी म्हणजेच १४ आॅक्टोबर रोजी या केंद्रांवर दाखल होणार असल्याने हे साहित्य त्यांच्यासोबत द्यावे लागणार आहे. त्यासाठी आता हे सामान सध्या भरण्याचे काम सुरू असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.
उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील खर्चाचा ताळमेळ नुकताच निवडणूक निरीक्षकांसमोर घेण्यात आला. यावेळी सर्व उमेदवारांनी आपला खर्च दाखल केला. उदय सावंत या उमेदवाराने मात्र खर्च सादर न केल्याने त्याला नोटीस बजावण्यात आल्याचे उकर्डे म्हणाले. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मतदानासाठी आता जेमतेम आठवड्याचा कालावधी राहिला असल्याने त्यादृष्टीने मतदार संघाची तयारी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे उकर्डे यांनी सांगितले.
रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघात एकूण २ लाख ६५ हजार २२५ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी निवारण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे. या सेंटरला ०२३५२-२२६२४८ या दूरध्वनीवर संपर्क केल्यास तेथे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे किंवा फिरत्या भरारी पथकाकडे पाठविल्या जाणार आहेत. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी त्या या क्रमांकावर पाठवाव्यात, मतदारांनी मतदानासाठी कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी केले आहे.
- शोभना कांबळे

रत्नागिरीतील चारही केंद्र ‘संवेदनशील’मुक्त
कोकणनगर, मुरूगवाडा, झाडगाव झोपडपट्टी आणि पेठकिल्ला या चार मतदान केंद्रांना संवेदनशील केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, या केंद्रातील मतदारांनी गत निवडणुकीत या केंद्रामध्ये केलेल्या मतदानाच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले. या चारही मतदान केंद्रांवर एकही बोगस मतदान झालेले नाही, तसेच या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे यंत्रणेच्या नजरेस आणून दिले आणि आपला मतदारसंघ संवेदनशील केंद्रात सहभागी करू नये, अशी विनंती केल्याने ही चारही केंद्र आता ‘संवेदनशील’मुक्त झाली असल्याचेही रत्नागिरीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी सांगितले.

Web Title: Polls will increase due to voter awareness - Prasad Ukarde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.