सिंधुदुर्गात आज तीन जागांसाठी मतदान
By Admin | Updated: October 14, 2014 23:22 IST2014-10-14T23:12:38+5:302014-10-14T23:22:05+5:30
९१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार

सिंधुदुर्गात आज तीन जागांसाठी मतदान
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून ९१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मतदान कर्मचारीही आज, मंगळवारी सकाळपासूनच संबंधित मतदान केंद्रांमध्ये रवाना झाले आहेत.२४ उमेदवारअजमावणार नशीब जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी, बसप, अखिल भारत हिंदू महासभा, प्रिझन्स अँड वर्कस पार्टी यांसह अपक्ष अशा पक्षांचे एकूण २४ उमेदवार उद्या आपले नशीब अजमावणार आहेत. उद्या सायंकाळी सहा वाजता या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रांत सील होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नारायण राणे व शिवसेनेचे वैभव नाईक, कणकवली मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नीतेश राणे व भाजपचे आमदार प्रमोद जठार, सावंतवाडी मतदारसंघामध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर व भाजपचे राजन तेली यांच्यात काँटे की टक्कर मानली जात आहे.
सहा लाख ४७ हजार ७५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
उद्या होत असलेल्या मतदान प्रक्रियेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा लाख ४७ हजार ७५३ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात तीन लाख २७ हजार ७९१ स्त्रिया, तर दोन लाख १९ हजार ९६२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६८ टक्के मतदान झाले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारीही किमान ७८ टक्के व्हावी, असे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बहुरंगी होणाऱ्या लढतींमध्ये विविध पक्षांचे २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले असून, प्रत्येक उमेदवार विजयाच्यादृष्टीने निवडणुकीमध्ये उतरला आहे. मात्र, काही असले तरी मतदार कोणाला न्याय देतात व कोणता उमेदवार निवडून येतो हे चित्र १९ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे.
प्रशासन सज्ज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मतदान निर्भय वातावरणात पार पाडावे यासाठी जिल्ह्याबाहेरून तीन पोलीस अधीक्षक, ७८ पोलीस अधिकारी व १०४५ पोलीस फौज, ३०० होमगार्ड अशी पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. अशाप्रकारे उद्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.