राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्र बाटविल
By Admin | Updated: February 2, 2015 23:51 IST2015-02-02T22:22:26+5:302015-02-02T23:51:49+5:30
विनायक राऊत : अर्जुन रावराणे विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहाते

राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्र बाटविल
वैभववाडी : शिक्षण क्षेत्र हे पूर्णत: राजकारणविरहित असले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रात एवढे राजकारण घुसले आहे की, राजकारण्यांनी संपूर्ण शिक्षण क्षेत्रच बाटविले, अशी खंत खासदार विनायक राऊत यांनी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केली.वैभववाडी तालुका शिक्षण संस्था संचलित अ. रा. विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष केशवराव रावराणे, सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, संस्था संचालक सदानंद रावराणे, अधीक्षक जयेंद्र रावराणे, प्रभारी तहसीलदार तळेकर, सज्जन रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, ए. बी. मोमीन, विलास साळसकर, दामोदर रावराणे, सचिन सावंत, आदी उपस्थित होते.खासदार राऊत पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या धोरणानुसार माध्यमिकपर्यंतचे मोफत शिक्षण देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य असताना आधीच्या सरकारने शिक्षण संस्थांचे एज्युकेशनल इंडस्ट्रीकरण करून शिक्षणाचा बाजार मांडला. तरीही सामाजिक भावनेतून कोकणातील संस्थाचालकांनी कोणतेही वेतनेत्तर अनुदान मिळत नसतानाही कोकणात शिक्षणाचा बाजार होऊ दिला नाही. त्यामुळे सामाजिक परिस्थिती वेगाने बदलत असताना संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे.ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात शिक्षण संस्था चालविणे फार कठीण काम आहे. परंतु, सामाजिक कर्तव्यभावनेतून कोकणातील संस्थाचालक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे अ. रा. विद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी निधी आपण देण्यास तयार आहोत, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शिवसेना भक्कमपणे पाठीशी : राऊत
अर्जुन रावराणे विद्यालयाचा कारभार सांभाळणारे जयेंद्र रावराणे धडाडीचे कार्यकर्ते असून, ते सामाजिक भावनेतून संस्थेचे कामकाज पाहताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा त्यांच्या कार्याला सदैव भक्कम पाठिंबा राहील. तसेच रावराणेंच्या सामाजिक कार्याला राजकीय आधार देण्यासाठी आम्ही सर्वजण संपूर्ण प्रयत्न करू, असे मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.