राजकीय क्षेत्र ढवळले

By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T23:06:17+5:302015-10-01T00:28:11+5:30

दोडामार्ग नगरपंचायतीचे बिगुल : सक्षम उमेदवारांसाठी चाचपणी

Political sphere grows | राजकीय क्षेत्र ढवळले

राजकीय क्षेत्र ढवळले

वैभव साळकर - दोडामार्ग-शासन नियमानुसार प्रथमच ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यावर निवडणूक आयोगाने कसई दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबरला जाहीर केल्याने निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवार शोधताना राजकीय पक्षांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना-भाजप एकत्र येत आघाडी व युती करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर या दोहोंसमोर अपक्षांचे कडवे आव्हानही याही निवडणुकीत उभे असेल, असा होरा राजकीय क्षेत्रातून वर्तविला जात आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासन सत्तेत असताना तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त करून देण्याचा निर्णय झाला आहे.
त्यामुळे कसई दोडामार्ग शहरात नगरपंचायत निवडणुकीचे नगारे आता घुमू लागले आहेत. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने पहील्या-वहिल्या नगरपंचायतीवर निवडूून जाण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे.
मात्र, अनेक ठिकाणी आरक्षित जागा झाल्याने आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. या पूर्वी कसई दोडामार्गची निवडणूक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लढविण्यात आली होती. मात्र त्यांनतर प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक होेणार असल्याने ही निवडणूक पक्षचिन्हावर लढविली जाणार आहे. मात्र, काही ठिकाणी पक्षचिन्हावर निवडणूक न लढता अपक्ष म्हणून रिंगणात उतरून मतदारांसमोर एक वेगळे चित्र तयार करण्याचा प्रयत्नही होण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने कसई दोडामार्ग शहरातील एका गटाकडून अपक्षांची मिळून आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राजकीय पक्षांसमोर अपक्षांचीच मोठी अडचण निर्माण होणार आहे. एकंदरीत कसई दोडामार्ग नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चांगलीच गाजणार असून राजकीय नेतेमंडळींसाठी त्यांचे अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून देणारी महत्वाची संधी ठरणार आहे, हे मात्र नक्की. त्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.

पदाधिकाऱ्यांची तारेवरची कसरत
कसई दोडामार्ग नगर पंचायतीसाठी १७ प्रभाग असून यातील तब्बल नऊ प्रभाग हे स्त्रियांसाठी राखीव आहेत. त्यापैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून तीन स्त्री उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. तर उर्वरीत पैकी अनुसूचित जातीसाठी-१, नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून-२ व सर्वसाधारणमधून पाच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून द्यावयाचे आहेत. मात्र, नगरपंचायतीसाठी पडलेले हे आरक्षण राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरले असून आरक्षित जागांवर उमेदवार शोधताना राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींची चांगलीच तारांबळ उडाली आहे. १ आॅक्टोबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरावयाचे असल्याने कमी कालावधीमध्ये राजकीय पक्षांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप या पक्षांनी जरी आघाडी आणि युती करण्याच्या वल्गना केल्या असल्या तरी अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याने आघाडी व युती होण्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. परिणामत: आघाडी आणि युतीच्या या घोळात उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Web Title: Political sphere grows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.