गणेशोत्सवाला राजकीय फिवर
By Admin | Updated: September 4, 2014 00:08 IST2014-09-03T22:58:37+5:302014-09-04T00:08:58+5:30
सावंतवाडीचे राजकारण ढवळले : सर्वच पक्ष मतदारांच्या भेटीला

गणेशोत्सवाला राजकीय फिवर
अनंत जाधव - सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यात सध्या गणेशोत्सवाला राजकीय फिवर चढला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घरोघरी गणेशोत्सवाला भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सावंतवाडीचे राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघाले असून, जिल्ह्याच्या राजकारणाचा सावंतवाडी हा केंद्रबिंदू होत आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर सर्वच उमेदवारांनी दावा ठोकल्याने येथील राजकीय रंगत चर्चेची बनली आहे. महायुतीकडून दीपक केसरकर, मनसेकडून परशुराम उपरकर, राष्ट्रवादीकडून राजन तेली, काँग्रेसकडून संदेश पारकर, वसंत केसरकर, शिवराज्य पक्षाकडून विलास गावडे आदी नेते मंडळी लढण्यास इच्छुक आहे.सर्वच पक्ष कंबर कसून काम करीत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश उत्सव आल्याने सर्वच उमेदवारांनी या नामी संधीचा फायदा करून घेण्याचे ठरवले आहे. दीपक केसरकर, राजन तेली आणि परशुराम उपरकर यांनी घरोघरी जाऊन गणपती दर्शन सुरू केले आहे. त्यातही प्रत्येक उमेदवाराने आपले वेगळेपण जपण्यासाठी तसेच आपली निशाणी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या भेट वस्तू पाठविण्यात येत आहेत. यावर्षीच्या गणेशोत्सवाला राजकीय फिवर चढला असून प्रत्येकाच्या दारी उमेदवारांचे तसेच नेत्यांचे पाय लागू लागल्याने मतदार राजाही खुशीत दिसत आहे. सावंतवाडी तालुक्यात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपती आहेत. यातील सर्वच गणेश मंडळांनी हालते देखावे केले. पण त्यांना राजकीय साज दिलेला नाही. सावंतवाडी तालुका गेल्या काही महिन्यात जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असला, तरी याचे प्रत्युत्तर कुठेही गणेश देखाव्यात दिसत नाही. सर्वच मंडळानी राजकीय देखाव्यांना बगल दिल्याचे जाणवत आहे.