राजकीय भूकंपाची चाहुल

By Admin | Updated: December 29, 2014 23:42 IST2014-12-29T21:58:50+5:302014-12-29T23:42:18+5:30

दोडामार्ग तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर. पक्षातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Political earthquake | राजकीय भूकंपाची चाहुल

राजकीय भूकंपाची चाहुल

वैभव साळकर - दोडामार्ग --लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही पक्षाचा झालेला दारूण पराभव, जिल्ह्यातील नेते मंडळींचे दोडामार्ग तालुक्याकडे झालेले दुर्लक्ष आणि गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पक्षाचे तालुकाध्यक्षपद आदी विविध कारणांमुळे दोडामार्ग तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. पक्षातील अनेक आजी- माजी पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भविष्यात लवकरच दोडामार्ग तालुक्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता तालुक्याच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही निवडणुकांमध्ये काँगे्रसला तालुक्यात सपाटून मार खावा लागला. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ संचारली. अशा परिस्थितीत तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला.
तो पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला. परंतु त्यानंतर रिक्त असलेले तालुकाध्यक्षपद पुन्हा भरण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जो उत्साह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होता, तो अचानक ओसरला. निवडणुकीत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर जिल्ह्यातील नेतेमंडळी त्यावर चिंतन करून पुन्हा एकदा पक्षसंघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती. मात्र, ती फोल ठरली.
जिल्ह्यातील नेते मंडळींनी आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर तालुक्यात येऊन एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते चलबिचल झाले असून पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत राहणे चांगले, या विचाराने अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना फोडण्यात यश आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच दोडामार्ग तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप पहावयास मिळणार आहे.


कसई-दोडामार्गमध्ये कमळ फुलणार?
तालुक्यात महत्त्वाची असलेल्या तालुका ठिकाणच्या कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीवर भाजपचे पदाधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. तालुक्याच्या ठिकाणची ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेत काँग्रेसला ‘जोर का धक्का’ देण्याच्या तयारीत भाजपची नेतेमंडळी असल्याचे बोलले जात आहे. त्यात काहीअंशी ते यशस्वी देखील झाले असून काही सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे कसई-दोडामार्ग ग्रामपंचायतीवर भाजपचे कमळ फुलणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Political earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.