राजकीय वातावरण तापल
By Admin | Updated: September 23, 2014 00:15 IST2014-09-22T22:50:17+5:302014-09-23T00:15:01+5:30
आरोंदा बचाव समितीकडून निषेध : काँग्रेस, मनसेकडून शिरोडकरांची भेटे

राजकीय वातावरण तापल
सावंतवाडी/आरोंदा : आरोंदा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांच्या कारवर शनिवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणावरून आता आरोंद्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. रविवारी रात्री मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकरांनी शिरोडकर यांची भेट घेतल्यानंतर सोमवारी सकाळी सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष बाळा गावडे, संजू परब आदींनी भेट घेऊन हल्ल्याचा निषेध केला. तसेच यातील आरोपींना तत्काळ अटक झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी नेत्यांनी केली आहे.
आरोंदा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांच्यासह त्यांच्या पत्नी व सून कुडाळ येथून कारने आरोंद्याकडे परतत असतानाच झारापपासून मळगावपर्यंत त्यांच्या कारचा अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग केला. हे हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले होते. त्यांनी कारवरच शिगेने हल्ला करून शिरोडकरांना शिवीगाळ केली व निघून गेले. याबाबत कारचालक संजय रेडकर यांनी सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली आहे. सावंतवाडी पोलिसांनी ही घटना कुडाळ पोलिसांच्या हद्दीत घडल्याने कुडाळला वर्ग केली आहे. पोलीस यातील आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेवरून आरोंदा येथील वातावरण तापू लागले आहे. तीन वर्षांपूर्वी आरोंदा येथील जेटी उभारण्याचे काम सुरू झाले. त्याच वेळी ही संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त शिक्षक असलेल्या अविनाश शिरोडकर यांची नेमणूक करण्यात आली. तर त्यांच्यासोबत विद्याधर नाईक, बाळ आरोंदेकर, आबा केरकर, प्रशांत कोरगावकर, महेश आचरेकर, गोकुळदास मोटे आदी काम पहात आहेत. या समितीने सतत जेटीच्या कामाला विरोध केला आहे.
अनेकवेळा आंदोलन तसेच उपोषण मंत्रिस्तरावर निवेदने दिली तर माजी आमदार उपरकरांनी आरोंदावासियांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. शनिवारी शिरोडकरांवर हल्ला झाल्यानंतर रविवारी तातडीने रात्री उशिरा आरोंदा येथे बैठक घेतली. या बैठकीत संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आपले काम योग्य पध्दतीने करून आरोपींना पकडावे, अशी मागणी केली. तसेच जेटीलाही कायम विरोध राहणार असेही स्पष्ट केले.
तर सोमवारी सकाळी काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, सभापती प्रमोद सावंत, संजू परब, तालुकाध्यक्ष बाळा गावडे, मनिष दळवी यांनी आरोंदा येथे जात शिरोडकरांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाचा कायम पाठिंबा राहणार असून हल्लेखोरांना शासन व्हावे, अशी मागणीही केली. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचेही सांगत हल्ल्याचा निषेध केला आहे. (प्रतिनिधी)
तपासात प्रगती नाही
सावंतवाडी पोलिसांनी हा गुन्हा कुडाळला वर्ग केला असला तरी कुडाळ पोलिसांना या प्रकाराबाबत म्हणावे तेवढे गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणाच्या तपासासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. शनिवारी घडलेल्या प्रकारानंतर रविवारी कारमधील शिरोडकर दाम्पत्याचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत.
हल्ला पूर्वनियोजितच : शिरोडकर
दरम्यान, या प्रकाराबाबत आरोंदा बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांना विचारले असता, हल्लेखोर हे शिगा वगैरे घेऊन आले होते. त्यामुळे हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे. आरोंदा संघर्ष समितीचे काम करत असून याआधी कोणतीही धमकी वा असा हल्ल्याचा प्रकार झालेला नाही. पण मागे हटणार नसल्याचेही त्यांनी सांगत, पोलिसांंनी हल्लेखोरांना तातडीने पकडावे, अशी मागणी केली आहे. यामुळे सत्य समोर येईल, अन्यथा आमच्यासारखे नेहमी भीतीच्या छायेखाली राहतील. मला भेटावयास आलेल्यांनाही एकच सांगितले की, दोषींना पकडण्याकरिता पोलिसांवर दबाव आणावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.