दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड
By Admin | Updated: September 10, 2016 00:09 IST2016-09-09T23:42:03+5:302016-09-10T00:09:54+5:30
खारेपाटणातील घटना : एकास अटक

दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड
कणकवली : खारेपाटण कोष्टीआळी येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ५१ हजार ८४० रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. तसेच अनधिकृतरीत्या गोवा बनावटीची दारू विक्री करीत असल्याप्रकरणी राजेंद्र्र महादेव रोडी (वय ४०) याला ही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कणकवली तालुक्यापासून जवळच तसेच मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण कोष्टीआळी येथे अनधिकृतरित्या गोवा बनावटीच्या दारुचा साठा करून ठेवून विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी खारेपाटण कोष्टिआळी येथील राजेंद्र्र रोडी याने चाळीच्या पाठीमागील गडग्याजवळ गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या लपवून ठेवल्या होत्या. यामध्ये दोन प्रकारच्या दारुचा समावेश होता. ८६४ दारुच्या बाटल्या या धाडीच्या वेळी जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच अनधिकृतरीत्या गोवा बनावटीची दारु विक्री करीत असल्याप्रकरणी राजेंद्र रोड़ी याला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत खारेपाटण पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस नाईक पांडुरंग राऊत यांनी तक्रार दिली.तर अधिक तपास पोलिस करीत आहेत.(प्रतिनिधी)
अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कणकवली तालुक्यातही पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार खारेपाटण येथे ही कारवाई करण्यात आली. अलीकडे वारंवार छोट्या मोठ्या कारवाईच्या घटना घडत असल्याने अनधिकृत दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, या कारवाईत सातत्य राहणार का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.