युवतीला पोलीस संरक्षण; ताबा घेण्यास आईची संमती
By Admin | Updated: August 21, 2014 00:26 IST2014-08-20T21:56:24+5:302014-08-21T00:26:07+5:30
सावंतवाडीतील राजकीय वातावरण तापले

युवतीला पोलीस संरक्षण; ताबा घेण्यास आईची संमती
सावंतवाडी : सावंतवाडीतील अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता ओळखून अत्याचारग्रस्त युवतीला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे युवतीच्या आईनेही जिल्हासत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल करीत मुलीचा ताबा मागितला आहे. यावर न्यायालयाने अंकुर महिला केंद तसेच तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे मागितले आहे.
दरम्यान, याप्रकरणावरुन सावंतवाडीतील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. काँग्रेसने या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करा, अशी मागणी केली. तर अत्याचारीत मुलीला मदतीचा हात शिवसेनेनेच पहिला दिला असल्याचा दावा शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणावरून सावंतवाडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. तसेच काही दक्षता समिती सदस्या तसेच कोणीही व्यक्ती अंकुरमध्ये युवतीला भेटण्यास जात असल्याचा आरोप काँग्र्रेसने केल्यानंतर आता या युवतीला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
तर युवतीच्या आईने गेले काही दिवस तिला क्षमा न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांनी आपल्या निर्णयात बदल केला आहे. युवतीला ताब्यात घेण्याचा निर्णय तिने घेतला असून याबाबत युवतीच्या आईने स्वत:च सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल करत मुलीचा ताबा द्यावा, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने तिचा अर्ज दाखल करून घेतला आहे. तसेच या अर्जावर न्यायालय तपासी अधिकारी तसेच अंकुर महिला केंद्राच्या अधीक्षका यांची बाजू ऐकून घेणार असून त्यानंतरच पुढील निर्णय देणार आहे.
अनेक युवकांचा पोबारा
मंगळवारी पोलिसांनी सर्वत्र अटकसत्र सुरू केल्यानंतर या प्रकरणातील अनेक युवक हे सावंतवाडी सोडून अन्यत्र गेले असल्याचे पुढे येत आहे. अनेकवेळा या युवतीसोबत या युवकांनी पार्ट्या झोडल्या आहेत. हे प्रकार शहरातील अनेकांनी पाहिले आहेत.
केसरकरांचा दबाव : परूळेकर
काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी माजी आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात नगरसेवकांचा मुलगा असून त्याला वाचवण्यासाठी केसरकर दक्षता समितीचा गैरवापर करीत आहेत. त्यांचे अंकुर महिला केंद्राजवळ काय काम आहे. तेथे का जातात, असा सवाल उपस्थित करत ज्या महिलांनी पोलिसांवर दबाव आणला आहे, त्यांचे मोबाईल तपासावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच मागच्यावेळी सावंतवाडीत घडलेल्या प्रकारावेळी सावंतवाडीची बदनामी होते, असे ओरड मारणारे केसरकरांचे या प्रकरणात काय झाले आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवसेनेचा मदतीचा हात : केसरकर
माझ्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेसने वस्तुस्थिती जाणून घ्यावी. ज्यावेळी ही युवती मुंबईला जात होती त्यावेळी तिला पहिला कोणी हात दिला आणि मुंबईला जाण्यापासून रोखले ते शिवसेनेने व त्याच्या कार्यकर्त्यांनी. त्यामुळे आम्हाला बदनाम करण्यापेक्षा ही मुलगी मुंबईला जात असताना कोणत्या अप्रवृत्तीच्या हातात गेली असती तर तिचे काय झाले असते, याचाही विचार करावा. आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास असून पोलिसांनीच यातील सत्य शोधावे, कोणाच्या हितासाठी कुणाला बदनाम करू नये, असेही केसरकर म्हणाले. (प्रतिनिधी)
सहाव्या आरोपीला बेळगावात अटक.
संशयितांना ओरोस येथे न्यायालयात हजर केले.
मुलीला पोलीस संरक्षण दिले.
मुलीचा ताबा मिळावा म्हणून आईचा न्यायालयात अर्ज
माजी आमदार दीपक केसरकर व डॉ. जयेंद्र परूळेकर यांची पत्रकार परिषद