जिल्ह्यात चारजणांना पोलीस संरक्षण
By Admin | Updated: May 18, 2014 00:25 IST2014-05-18T00:22:30+5:302014-05-18T00:25:35+5:30
सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचारात आघाडीवर राहिलेल्या माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या जिवाला धोका निर्माण झाला

जिल्ह्यात चारजणांना पोलीस संरक्षण
सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचारात आघाडीवर राहिलेल्या माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. जिल्ह्यातील अन्य तीनजणांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. यात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, गौरीशंकर खोत, आदींचा समावेश आहे. या सर्वांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणे संरक्षण देण्यात येणार्या व्यक्तिंची यादी प्रत्येक पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मंगेश तळवणेकर यांनी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. गांधी चौकात जाहीर सभाही तळवणेकर यांनी घेतली होती. तसेच शिवसेनेच्या प्रचारासाठी त्यांनी गावागावांत सभा घेत नागरिकांना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या गावांमध्ये शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी लागलेले आहेत. त्यात शिवसेनेचे विनायक राऊत हे विजयी झाले आहेत. यात तळवणेकर यांच्या मतदारसंघात मिळालेले मताधिक्य पाहता त्यांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो म्हणून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)