सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना आज उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले. धनावडे यांचा जिल्ह्यात सलग तीन वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव होत आहे. धनावडे हे बीकॉम एलएलबी आहेत. 1991 मध्ये थेट भरतीत ते पोलिस उपनिरीक्षक झाले. प्रशिक्षणानंतर त्यांनी नागपूरसह विदर्भात काम केले. पुढे काही काळ ते उच्च पदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठीच्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होते. 2010ला पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. 18 वर्षे त्यांनी ठाणे पोलीस विभागात काम केले. यात उल्हासनगर, महात्मा फुले पोलीस स्टेशन या दोन ठिकाणी निरीक्षक, अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे यांचे रिडर याशिवाय कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्येही त्यांनी काहीकाळ सेवा बजावली.1 जून 2017 ला ते सिंधुदुर्गात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रुजू झाले. या काळात गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण, साखर लूट प्रकरण आदीमध्ये उत्कृष्ट तपास करत गुन्हेगारांना पकडले. सावंतवाडी कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी सूक्ष्म तपास करत तत्कालीन कारागृह अधीक्षक व त्याच्या साथीदारावर स्वतः फिर्याद दिली. इतरही अनेक गुन्ह्यांचा तपास लावला. 3 मार्चपासून ते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याआधी कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल दोन पदके, 2018 मध्ये केंद्राकडून उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार, 2019 मध्ये पोलीस महासंचालक पदक आणि आता एकूण कारकिर्दीचा विचार करून मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
पोलीस अधिकारी सुनील धनावडे यांना राष्ट्रपती पदक; उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 19:46 IST