पोलीस अधिकाऱ्याकडून वाहतूक पोलिसाला मारहाण
By Admin | Updated: November 7, 2014 23:40 IST2014-11-07T21:49:20+5:302014-11-07T23:40:30+5:30
पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. वरिष्ठ त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष

पोलीस अधिकाऱ्याकडून वाहतूक पोलिसाला मारहाण
वैभववाडी : पोलीस पाटलाने निवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत चक्क पोलीस अधिकाऱ्याने वाहतूक पोलिसाला रस्त्यावर लोळवून मारले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे काहीकाळ तळेरे- वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी रात्री झालेल्या या तमाशामुळे पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली असून वरिष्ठ त्यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलीस ठाण्यात सर्वाधिक उठबस असलेल्या लगतच्या गावातील पोलीस पाटील सेवानिवृत्त झाला. त्याने निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील आपल्याच गावात असलेल्या हॉटेलमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत तीन पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलिसासह काही अन्य पोलीस कर्मचारी सहभागी होते. पार्टी रंगात येत असताना एका अधिकाऱ्याचा ‘ग्लास’ पडल्याने वाहतूक पोलीस काहीतरी पुटपुटला.
वाहतूक पोलिसाच्या पुटपुटण्याचा राग आल्यामुळे त्या अधिकाऱ्याने वाहतूक पोलिसाला हॉटेल समोरील रस्त्यावर मारहाण केली. त्या अधिकाऱ्याला बाहेरून आलेल्या दुसऱ्या अधिकाऱ्यानेही चोख साथ दिली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यावर हा कायद्याच्या रक्षकांचा तमाशा सुरू होता. त्यामुळे तळेरे-वैभववाडी मार्गावरील वाहतूकही काहीकाळ ठप्प झाली होती. या हाणामारीत वाहतूक पोलिसाचा युनिफॉर्म फाटला आणि पट्ट्याचे बक्कलही तुटले.
युनिफॉर्मवरील वाहतूक पोलिसाला मारहाण सुरू असल्याचे पाहून दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांमधील लोक त्याला सोडविण्यासाठी सरसावले. मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रंगलेला तमाशा पाहून सगळेच थबकले. कायद्याच्या रक्षकांनीच जबाबदारीच्या जाणीवेचे भान हरपून खुलेआम केलेल्या तमाशाची गेले दोन दिवस तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, पोलीस या घटनेबाबत भाष्य टाळून कानावर हात ठेवत आहेत. भर रस्त्यातील तमाशामुळे निवृत्त पोलीस पाटलाच्या पार्टीचा बेरंग तर झालाच त्याचबरोबर पोलीस खात्याची बेअब्रू झाली आहे. त्यामुळे ‘खात्या’ची माणसे म्हणून वरिष्ठ अधिकारी या घटनेवर पांघरूण टाकतात की नियमानुसार कारवाई करणार याचे साऱ्यांना औत्सुक्य आहे. सामान्य जनतेला कायद्याचा धाक दाखविणाऱ्यांनीच कायदा मोडल्याने खात्याच्या प्रतिमेविषयी जनतेला शंका निर्माण होऊ लागली
आहे. (प्रतिनिधी)