आरोंदा ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीमार

By Admin | Updated: January 6, 2015 23:59 IST2015-01-06T22:28:17+5:302015-01-06T23:59:46+5:30

सोमवारी मध्यरात्रीचा प्रकार : पंधरा जखमी, अनेकांना उचलून व्हॅनमध्ये टाकले, आरोंद्याला पोलिसांचा गराडा

Police lathamar on the villagers | आरोंदा ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीमार

आरोंदा ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीमार

सावंतवाडी : आरोंदा येथे जेटी समर्थकांनी ग्रामस्थांवर केलेल्या दगडफेकीनंतर रात्री उशिरा वातावरण आणखी चिघळले. यातच ग्रामस्थांनी जेटीच्या कार्यालयावर दगडफेक केली व सुरक्षा कक्ष फोडून टाकला. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांसमोर ठिय्या करीत, जोपर्यंत माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, राजन आरोंदेकर यांना अटक करीत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास या तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरही अटकेची कारवाई केली. ग्रामस्थांनी याला जोरदार विरोध केला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जोरदार लाठीमार करीत अनेकांना पोलीस व्हॅनमध्ये टाकले. यातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंतही सुटू शकले नाहीत. या लाठीमारात जमावातील १० ते १५ जण जखमी झाले आहेत.
आरोंदा येथे सोमवारी स्थायी समितीने भेट दिली. या भेटीवेळी स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांनी जेटी परिसरात उभारलेली भिंत तसेच अडविण्यात आलेला रस्ता याबाबतची माहिती स्थायी समितीला दिली. त्यानंतर स्थायी समितीने बंदर विभागाचे अधिकारी प्रदीप आगासे यांना घेराओ घालत रस्ता अडवला. त्यांच्या मागणीनुसार तक्रार नोंद होत असतानाच आरोंदा येथे बैठकीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांनी राजन तेलींसह अन्य समर्थकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी दगडफेकीचा वर्षाव सुरू झाला.
हा प्रकार तब्बल वीस मिनिटे सुरू होता. यातील काही दगड ग्रामस्थांना लागले. यात सुशांत पेडणेकर, पांडुरंग कोरगावकर, सूरज सारंग, समीर नाईक हे चौघेजण जखमी झाले. या सर्वांना आरोंदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संतप्त ग्रामस्थांनी कंपनी समर्थकांच्या दगडफेकीच्या निषेधार्थ कंपनीचा सुरक्षा कक्ष फोडला. तसेच जोपर्यंत माजी आमदार राजन तेली यांच्यासह काका कुडाळकर, राजन आरोंदेकर यांना अटक होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या लक्षात येताच त्यांनी अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधत घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपअधीक्षक विजय खरात यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तसेच पोलीस कर्मचारी आरोंदा परिसरात दाखल झाले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जमलेल्या ग्रामस्थांशी तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संजू परब, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, संग्राम प्रभूगावकर यांच्याशी चर्चेचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थ तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्यांना अटक करा, तरच आंदोलन मागे घेऊ, अशी आक्रमक भूमिका घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यापैकी काही जण तर पोलिसांच्या अंगावर धावून जात होते.
अखेर पोलिसांनी माजी आमदार राजन तेली यांंच्यासह काका कुडाळकर व राजन आरोंदेकर यांना रात्री साडेअकराच्या सुमारास अटक केली व पोलीस व्हॅनमधून सावंतवाडीच्या दिशेने रवाना केले. मात्र, ग्रामस्थांना न दाखवताच नेल्याच्या रागातून ग्रामस्थांनी पुन्हा घोषणाबाजी केली. परिस्थिती पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याशी चर्चा करीत लाठीमाराचा निर्णय घेतला.यादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांना, तर राज्य राखीव पोलीस दलाने सतीश सावंत यांना उचलून गाडीत टाकले. जमाव आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच लाठीमार केला. लाठीमारात १५ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी ग्रामस्थांमधील १४ जणांना ताब्यात घेतले असून या सर्वांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. (प्रतिनिधी)


नीतेश राणे सावंतवाडी पोलीस ठाण्यात

तेली, कुडाळकरांना हलविले
माजी आमदार राजन तेली व काका कुडाळकर यांना पोलिसांनी सावंतवाडीत आणल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले. त्यातच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही येथेच आणल्याने तेली व कुडाळकरांना कुडाळ ठाण्यात हलविले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, बांदा व दोडामार्ग येथील तब्बल १५० ते २०० पोलीस आरोंद्यात बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. याशिवाय राज्य राखीव दलाचे अधिकारी व पाच पोलीस ठाण्यांचे प्रमुख उपस्थित होते.
आरोंदा जेटी विरोधातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या जखमींची नीतेश राणे यांनी विचारपूस केली.
पालकमंत्र्यांबाबत नाराजी
आरोंदा जेटीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीमार केला. मात्र, पालकमंत्री मतदारसंघात असूनही आरोंदा येथे फिरकले नाहीत. याबाबत आरोंदावासीयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

विनिता साहूंवर महिला नाराज
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी आरोंदावासीयांना अपशब्द वापरले, असा आरोप करून आंदोलनकर्त्या महिला कमालीच्या नाराज झाल्या. यावेळी त्यांनी अनेक शब्दांची आठवण करून देत असे पुन्हा ऐकून घेणार नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: Police lathamar on the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.