पोलिसांचा तपास योग्य दिशेने-युवतीवर झालेला अत्याचार
By Admin | Updated: August 21, 2014 00:26 IST2014-08-20T21:54:17+5:302014-08-21T00:26:56+5:30
संजयकुमार बाविस्कर : आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची माहिती

पोलिसांचा तपास योग्य दिशेने-युवतीवर झालेला अत्याचार
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडीमध्ये अल्पवयीन युवतीवर झालेला अत्याचार हा तिच्या ओळखीच्या (जवळच्या) नात्यातील व्यक्तींनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. पोलीस योग्यप्रकारे तपास करीत आहेत आणि या प्रकरणातील सहाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली.
याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाले, सावंतवाडीतील वासनाकांड उघड झाल्यानंतर अत्याचारीत युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडीत पोलिसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल करून सहाही संशयित आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित अत्याचारीत युवती आपल्या मामाकडे सावंतवाडीला रहात होती. याच कालावधीत तिच्या मामाचा मुलगा (अमित मोर्ये) याने तिच्याशी जवळीक साधली तर मामीच्या भावाच्या मुलाचे (नंदकिशोर गावडे) याचेही तेथे येणेजाणे सुरु होते.
संबंधित युवतीशी त्यानेही जवळीक साधली होती. तिच्याशी अनेकवेळा लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महेश सावंत याच्याशी तिची मैत्री झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. तो तिच्यावर अत्याचार करीत होता. तर आदित्य आरेकर याची फेसबुकवर ओळख झाली होती.
या मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधित मुलीने आपल्या आईला सांगितले होते. मात्र आईने तिची दखल घेतली नाही. म्हणून त्या युवतीने आपल्या काकाला याबाबत अत्याचार होत असल्याचे सांगितले. तेव्हा काकाने तिची वैद्यकीय तपासणी केली. मात्र पुढे कोणतीही दखल घेतली नाही. अखेर त्या संबंधित युवतीने वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे दुसरीकडे रहात असताना तिची सुफियान मेहबूब शेख याच्याशी ओळख झाली. त्यानेही तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार सुरु ठेवला.
याबाबत त्या युवतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पाच संशयित आरोपींना अटक केली तर फरारी असलेला सुफियान शेख याला बुधवारी पहाटे बेळगाव येथून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी दिली. तर याबाबतच्या तपासात कोणताही राजकीय दबाव नाही. संबंधित युवतीची तक्रारीसाठी मानसिकता होण्यास विलंब लागला. तिला अभय देऊन त्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. याबाबत योग्य तपास होईल. कोणताही दबाव घेतला जाणार नाही. (प्रतिनिधी)
योग्य न्याय मिळवून देवू
सावंतवाडी येथील वासनाकांड ही गंभीर बाब आहे. यामध्ये संबंधित अत्याचारीत मुलीच्या नातेसंबंधातील मुलांकडूनच तिच्यावर अत्याचार झालेला आहे. या प्रकरणाच्या तपासात कोणताही राजकीय दबाव नाही. त्या अत्याचारीत मुलीला न्याय देण्याचे आमचे प्रयत्न राहतील, असेही यावेळी पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी सांगितले.
जास्त शिक्षेसाठी प्रयत्न
यामध्ये आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यालाही लवकरच ताब्यात घेऊ. अद्यापही तपास सुरु आहे. आवश्यक पुरावे गोळा करून अशा वाईट प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असे जिल्हा पोलीस उपअधीक्षक विनिता साहू यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.