पोलिसाला मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: November 30, 2014 00:50 IST2014-11-30T00:45:28+5:302014-11-30T00:50:18+5:30
पाचही जण फरार : मालवण येथील घटना

पोलिसाला मारहाणप्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल
मालवण : मालवण येथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला जमाव करून पाच युवकांनी मारहाण केली. तसेच जिमारण्याचा प्रयत्न केला म्हणून येथील राजेश रमेश पारकर, साईराज उमेश पारकर, रणजित रमेश पारकर, रमेश मनोहर पारकर, गिरीश पेडणेकर (सर्व रा. बाजारपेठ मालवण) या पाचजणांवर मालवण पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाणीची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती.
वाहतूक पोलीस कर्मचारी व्ही. व्ही. धुरी यांच्या तक्रारीनंतर पाचही संशयितांवर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, पाचही जणांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी भरडनाका गजबजलेला असताना राजेश दीपक कामतेकर (वय २६, रा. वाघपिंपळ) हा युवक आपल्या दुचाकीसह तिथे उभा होता. यावेळी राजेश पारकर, गिरीश पेडणेकर, साईराज पारकर असे तिघेजण एका मोटारसायकलवरून त्याठिकाणी आले. त्यांनी कामतेकर यास मारहाण करण्यास सुरुवात केली. पाच-सहा मिनिटे चाललेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच त्या तिन्ही युवकांनी एकाच मोटारसायकलवरून बाजारपेठेच्या दिशेने पळ काढला.
बाजारपेठेतून ट्रीपल सीट भरधाव वेगाने जात असताना वाहतूक पोलीस विठ्ठल धुरी यांनी त्यांना कारवाई करण्याच्या हेतूने अडविले. मात्र, त्यांनी पोलीस कर्मचारी धुरी यांचे काहीही न ऐकता त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. राजेश पारकर याने धुरी यांचा डावा हात मुरगळून त्यांच्या हातातील फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला व इतरांसह धुरी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
जीवे मारण्याचा प्रयत्न
राजेश पारकर, साईराज पारकर व गिरीश पेडणेकर हे धुरी यांना मारहाण करत असतानाच त्याठिकाणी रमेश मनोहर पारकर व रणजित रमेश पारकर हे दोघेजण आले. या सर्वांनी मिळून पोलीस कर्मचारी धुरी यांना ढकलत रस्त्याशेजारील बिलवडकरांच्या गल्लीत घेऊन गेले. यावेळी रमेश याने ‘या पोलिसाला ठार मारुया, याला जिवंत सोडू नको’ असे सांगत धुरी यांचे हातपाय धरलेले असताना त्यांचा गळा व तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे धुरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसात धुरी यांना मारहाण करणाऱ्या पाचही जणांविरोधात बेकायदेशीर जमाव करून सरकारी कामात अडथळा आणत, पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धमकी देऊन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पाचही संशयित पसार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पाचहीजण अटकपूर्व जामीन मिळवू शकतात काय या शक्यतेवर ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले तरीही त्यांना जामीन होऊ शकणार नसल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)