पोलीस फौजफाट्यासह मोहीम फत्ते
By Admin | Updated: July 15, 2015 21:27 IST2015-07-15T21:27:09+5:302015-07-15T21:27:09+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांची कल्पना : चोरट्यांना गजाआड केल्याने नागरिकांमध्ये समाधान

पोलीस फौजफाट्यासह मोहीम फत्ते
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात चोरट्यांनी धुडगूस घालून जिल्हा पोलीस प्रशासनाच्या नाकीनऊ आणलेल्या आंतरराज्य टोळीतील (मध्य प्रदेश) एकाच गावातील तीन आरोपींना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘आॅपरेशन आॅल आऊट व कोंबिंग आॅपरेशन’ ही मोहीम आखत अवघ्या दोन दिवसांत ताब्यात घेतले. या मोहिमेत जिल्हा पोलीस अधीक्षक, अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल ५५० पोलिसांनी सहभाग घेत मोहीम फत्ते केली. सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा पोलीस फौजफाटा वापरून मोहीम फत्ते करण्यात पोलीस अधीक्षकांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १९ मे रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर जिल्ह्यात घरफोड्या, इतर चोऱ्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत गेली. त्यावेळी नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यापुढे जणू चोरट्यांनी दिलेले आव्हानच होते. प्रत्येक रात्री एक ते दोन घरफोड्या, फ्लॅटमध्ये चोरी, तसेच मंदिर व इतर ठिकाणांमधील चोऱ्या होतच होत्या. सुरुवातीला कणकवली शहर टार्गेट केल्यानंतर वैभववाडी, सावंतवाडी व त्यानंतर कुडाळ शहरांकडे या चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला होता. वाढत्या चोरी सत्रामधील गुन्हे उघडकीस आणण्यात या पोलिसांना यश येत नव्हते. त्यातच जनतेच्या रोषाला जिल्हा पोलीस प्रशासनाला सामोरे जावे लागत असल्यामुळे पोलीसही हतबल झाले होते. जिल्ह्यात संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांची गस्त वाढवून फिक्स पॉर्इंट आखूनसुद्धा पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. जिल्ह्यात १ जूनपासून १३ जुलैपर्यंत तब्बल २४ घरफोड्या झाल्या आहेत. त्यापैकी कणकवली, सावंतवाडी व कुडाळ येथे प्रत्येकी चार घरफोड्या झाल्या आहेत. एवढ्या चोऱ्या, घरफोड्या होत असूनसुद्धा पोलीस प्रशासनाला चोरटे मिळत नसल्याने चहुबाजूंनी पोलिसांवर टीकेची झोड उठत होती. (प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांची कल्पना उतरली सत्यात
दरम्यान, या चोरट्यांना कसे पकडता येईल, याचा सारासार विचार करून जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात आॅपरेशन आॅल आऊट ही मोहीम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यातील आपल्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ४०० पोलीस समाविष्ट करून घेण्यात आले, तर कोंबिंग आॅपरेशनमध्ये १५० पोलिसांचा समावेश करण्यात आला. या मोहिमेमुळे आरोपी सुरेश मोहेल, अशोक अजनार व रमेश सिंह या मध्य प्रदेशमधील आंतरराज्य टोळीला गजाआड करण्यात यश मिळाले. बहुधा सिंधुदुर्गच्या इतिहासात एवढा मोठा पोलीस फौजफाटा वापरून करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. अजूनही या टोळीतील काही आरोपी फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.