बांदा येथे पोलिसांचा सत्कार
By Admin | Updated: September 15, 2014 23:26 IST2014-09-15T21:39:23+5:302014-09-15T23:26:55+5:30
व्यापारी संघाचे आयोजन : उत्तम वाहतूक नियोजन, सुरक्षा

बांदा येथे पोलिसांचा सत्कार
बांदा : बांदा बाजारपेठेतील प्रतिबंधित भागात विसर्जन मिरवणुकांदरम्यान फटाके बंदीची कडक अंमलबजावणी केल्याबद्दल तसेच गणेश चतुर्थी कालावधीत उत्तम वाहतूक नियोजन व सुरक्षा व्यवस्था राखल्याबद्दल बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुंठे यांचा बांदा व्यापारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
बांदा पोलीस ठाणे येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, निवृत्त गटविकास अधिकारी भास्कर पावसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर, पोलीस कर्मचारी एस. एस. नावडकर, सुधीर कदम आदी उपस्थित होते.
बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, चतुर्थीपूर्वी नियोजनासाठी दक्षता समितीची बैठक घेऊन गुठे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे गांभीर्य ओळखून कडक अंमलबजावणी केली. भास्कर पावसकर म्हणाले, बाजारपेठेतील फटाके बंदीमुळे गेल्या अनेक वर्षांनंतर आपण विसर्जन मिरवणूक पाहिली. अन्यथा या आधी दोनवेळा मिरवणुकीतील फटाक्यांमुळे आपल्या व शेजारच्या घरात आगीमुळे नुकसान अनुभवले आहे. राकेश केसरकर म्हणाले की, मिरवणुकीतील फटाके बंदीचे चांगले फलित म्हणून यंदा ढोल पताकांवर वाजतगाजत मिरवणुका निघाल्या व यापुढेही आदर्श मिरवणुका निघतील.
यावेळी सत्काराला उत्तर देताना जयप्रकाश गुठे म्हणाले, पोलीस हा निधर्मी मनाने कोणतेही वैयक्तिक हेतू न बाळगता जनतेच्या हितासाठी कायद्याची अंमलबजावणी करीत असतो. त्यात जनतेचे सहकार्य मोलाचे ठरते. बांदावासीयांच्या सहकार्यामुळेच हे वाहतूक नियोजन तसेच सुरक्षा तरतुदी शक्य झाल्या. यावेळी दत्तप्रसाद पावसकर यांच्या हस्ते गुठे यांना शाल, श्रीफळ व गणेश मूर्ती प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सचिन नाटेकर, मंगलदास साळगावकर, भास्कर पावसकर, संदीप प्रभू, राजेंद्र कुबडे, स्वप्निल पावसकर, श्रीकांत कु बडे, सूर्यकांत नार्वेकर, नंदू कल्याणकर, प्रसाद कामत, किशोर साळगावकर, दत्तप्रसाद केसरकर, प्रदीप सावंत, मिलिंद सावंत, विवेक विर्नोडकर, नीलेश नाटेकर, साहिल कल्याणकर, राजू खान, सागर तेली आदींसह अनेक व्यापारी उपस्थित होते. स्वागत संदीप प्रभू, सूत्रसंचालन सचिन नाटेकर, आभार राकेश केसरकर यांनी मानले. (प्रतिनिधी)