जगण्यावर शतदा प्रेम करणारा मराठीतील कवी गेला

By Admin | Updated: December 31, 2015 00:26 IST2015-12-30T22:59:34+5:302015-12-31T00:26:59+5:30

पुलोत्सव पुरस्काराचेही निमित्त : साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रंगलेली रत्नागिरीतील भेट

A poet from Marathi who went to love life has gone | जगण्यावर शतदा प्रेम करणारा मराठीतील कवी गेला

जगण्यावर शतदा प्रेम करणारा मराठीतील कवी गेला

रत्नागिरी : जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारा, प्रेम जगणारा तरूण मनाचा कवी गेला, अशा अनेक प्रतिक्रिया रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच व्यक्त केल्या आहेत.मंगेश पाडगावकर यांचे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरीत येणे झाले होते. आॅक्टोबर २०१३मध्ये आर्ट सर्कलने आयोजित केलेल्या पुलोत्सवात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी पाटगावकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कवितांवर आधारित ‘माझे जीवन गाणे’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना पाडगावकर यांनी ‘मला मृत्युचे सावट आजुबाजुला असल्याचे वाटते. मृत्यूची आता मला भीती वाटते, असे निराशाजनक उद्गार त्यांनी काढले होते. महाराष्ट्रातील लोकांना, रसिक जनतेला आणि अबालवृद्धांना कवितेने समृद्ध करणारे महान कवी मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. निधनाचे वृत्त कळताच अनेक क्षेत्रातून त्यांच्या काव्यप्रतिभेबाबत अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. व्हॉट्सअ‍ॅपवरूनही पाडगावकर यांच्या सलाम आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं, या प्रसिद्ध कविता शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाडगावकर यांच्या आठवणी अजूनही रत्नागिरीकरांच्या स्मरणात आहेत. (प्रतिनिधी)


मराठी कवितेतला शुक्रतारा अस्ताला गेला
मंगेश पाडगावकर यांच्या रुपाने माणसावर, निसर्गावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकविणारा एक ‘जिप्सी’ कवी गेला. पाडगावकरांनी आयुष्यभर सौंदर्याचं गाण गायलं आणि महाराष्ट्राला प्रेम करायला शिकवलं. मानवी भावनांचा नितळपणा आणि निसर्गाचे सौंदर्य यांची त्यांनी सांगड घातली. वेंगुर्ल्यात जन्म घेतलेल्या पाडगावकरांनी कोकणवर आणि मालवणी बोलीवर अतिशय प्रेम केलं. विंदा, बापट आणि पाडगावकरांनी काव्यवाचनाने रसिकांना महाराष्ट्राला कविता शिकविली. कोमसापच्या चिपळूण येथील पहिल्या साहित्य संमेलनात पाडगावकरांची प्रकट मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी ‘श्रावणात घन निळा बरसला ’ व ‘सलाम’ या दोन्ही कवितांमधील खरे पाडगावकर कोणते, असा प्रश्न मी विचारला असता त्यांनी उत्तर दिले, ‘दोन्ही’. मराठी कवितेतील ‘शुक्रतारा’ आता अस्ताला गेला आहे. या प्रतिभावान मराठी कवीला मानाचा ‘सलाम’.
- अ‍ॅड. विलास पाटणे, रत्नागिरी
आनंदयात्रीला सलाम !
ज्यांच्या कवितांचं बोट धरून आम्ही बालपणी पावलं टाकली, तारूण्यात प्रेम केलं, प्रौढत्वात अंतर्मुख झालो, त्या आनंदयात्रीला सलाम! मंगेशाचं देणं आम्हाला श्रीमंत करून गेलं.
- दीप्ती कानविंदे, रत्नागिरी

Web Title: A poet from Marathi who went to love life has gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.