प्रतिज्ञा करूया भारताच्या अखंडतेची

By Admin | Updated: October 31, 2014 00:40 IST2014-10-31T00:38:03+5:302014-10-31T00:40:42+5:30

आज राष्ट्रीय एकात्मता दिन : ऐक्य अबाधित राखणे प्रत्येकाचीच जबाबदारी!

Pledge to India's integrity | प्रतिज्ञा करूया भारताच्या अखंडतेची

प्रतिज्ञा करूया भारताच्या अखंडतेची

अजय लाड ल्ल सावंतवाडी
विविधतेतून एकता याचे प्रतिक म्हणून भारत देशाकडे पाहिले जाते. या देशात विविध धर्माचे, जातीचे आणि पंथाचे लोक एकत्र नांदतात. चीननंतर जगातील लोकसंख्येत आघाडीवर असलेल्या भारत देशातील एकता कायम राखण्याकरिता राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन करण्यात येते. ३१ आॅक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त साऱ्या भारतीयांनी देशाच्या अखंडतेसाठी प्रतिज्ञा घेत ऐक्य आणि सामंजस्याची रुजवण करणे, एवढाच या दिनाचा उद्देश आहे.
देशात एकूण २९ राज्य आणि ७ संघराज्य आहेत. तसेच देशातील २२ भाषांना संविधानातून मान्यता दिली आहे. तर हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून गौरविले आहे. स्वांतत्र्यापासून आतापर्यंतच्या काळात भारतीयांमधील एकता तोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, देशातील आणि देशाबाहेरील या वाईट प्रवृत्ती कदापि यशस्वी झाल्या नाहीत. कारण या देशातील बंधुता ही प्रत्येक भारतीयाच्या मनात वसलेली असून त्याचे बंध तोडणे शक्य नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काही कालावधीत देशातील जनतेमध्ये जातीधर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यानंतरही देशाची अखंडता कायम राहिली आहे. येथील काही लोकांमधील ऐक्य व जातीय सलोखा कमी झालेला असल्याचे लक्षात आल्याने राष्ट्रीय एकात्मता दिनाला महत्त्व प्राप्त होते.
भारताला एक मजबूत आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीकोनातून देशातील धर्म, संस्कृती, जातपात, रुढी परंपरा यांच्यात सांगड घालणे गरजेचे बनलं. लोकांमधील विविधता एका समान पातळीवर आणणे आवश्यक बनले आणि त्यातूनच राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना रुढ झाली. देशातील साऱ्यांनी भारतीय या एका ओळखीने एकत्र आल्यास देशातील माणसामाणसातील बंध तुटून अखंड भारत निर्माण झाला आहे. ब्रिटीशांच्या विरोधातील लढाईत भारतीयांनी या एकतेचे सामर्थ्य अनुभवले असून त्याची प्रचितीही देशाच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून सर्वांसमोर आहे. राष्ट्रीय एकात्मता दिन हा आंतर राज्य युवक एक्सचेंज कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मता शिबिरे, राष्ट्रीय युवा महोत्सव, युवा पुरस्कार, एकात्मतेबाबत परिषदा, चर्चासत्रे आयोजित करुन सर्वांमध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आयोजित शिबिरांमध्ये, महोत्सवामध्ये देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. प्रत्येक संस्कृती, धर्म, भौगोलिक परिस्थिती ही आपापल्या ठिकाणी उदात्त असल्याची जाणीव यातून करुन दिली जाते. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्याही ३१ आॅक्टोबर १९८४ साली झाली होती. त्यांच्या आठवणीसाठी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो, ज्यामुळे कोणत्याही अघटीत घटनेने देशाच्या एकतेला बाधा येऊ नये, हाच उद्देश यामागे आहे.
राष्ट्रीय एकता कायम राखण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे. देशातील जातीयतावाद, धर्मांमधील तेढ व प्रादेशिकतावाद यांच्या समूळ नष्टतेसाठी १९६१ साली पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना केली होती. देशात शांतता नांदण्यासाठी अंतर्गत समस्या मिटविण्याचे कार्य ही परिषद करत होती. या परिषदेची २0१0 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना १४७ सदस्यांसह पुनर्बांधणी करण्यात आली. जातीय सलोखा राखणे, तेढ कमी करणे, सर्व समस्या चर्चेतून सोडविण्याचे काम या परिषदेच्या सदस्यांव्दारे केले जाते.
प्रत्येकजण वेगळे राज्य वेगळा प्रदेश मागत असतानाच या एकात्मता दिनानिमित्त त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणून चर्चा घडवून जनजागृती करण्याची जबाबदारी आपल्या साऱ्यांचीच आहे. देशाची अखंडता राखण्यासाठी प्रत्येकानेच प्रतिज्ञा करावी, 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत'.
एकात्मता दिन साजरा करण्याची कारणे
४देशातील नागरिकांना शांतता, एकमेकांतील प्रेम अबाधित ठेवण्यासाठी व ऐक्य बाळगण्याकरिता प्रोत्साहीत करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन केले जाते.
४एकमेकांबद्दलचा आदर वृध्दींगत होण्यासाठी या दिनाला महत्त्व दिले गेले आहे.
४वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, धर्म, भौगोलिक विविधता असल्याने येथील लोकांमध्ये सुसंवाद घडविण्यासाठी, समाजातील ऐक्य बळकट करण्यासाठी विविध धर्म व प्रांतातील चांगल्या गोष्टी सर्वांना ज्ञात होण्यासाठी.

Web Title: Pledge to India's integrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.