अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन
By Admin | Updated: September 8, 2015 22:34 IST2015-09-08T22:34:26+5:302015-09-08T22:34:26+5:30
विशेष पथकाची स्थापना : महाराष्ट्र-गोवा सीमेवर पोलिसांचे विशेष लक्ष

अपघात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन
नीलेश मोरजकर -- बांदा गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे येथून चाकरमनी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणार आहेत. यामुळे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी बांदा पोलिसांनी वाहतुकीचे विशेष नियोजन केले असून गणशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष पथकाची स्थापना केली आहे.बांदा शहर तसेच महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. यासाठी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या टिमचे महामार्गावरील वाहतुकीवर विशेष लक्ष असणार आहे. गणेश उत्सवातील बांदा पोलिसांच्या नियोजनाबाबत पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी सविस्तर माहिती दिली.सिंधुदुर्गातुन गोव्यात जाताना तसेच गोव्यातून सिंधुदुर्गात येताना चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करत असल्याने गणेश उत्सव कालावधीत हा महामार्ग नेहमीच गजबजलेला व वर्दळीचा असतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जुना मुंबई-गोवा महामार्ग तसेच झाराप-पत्रादेवी बायपासवर वाहतुकीची वर्दळ असते.बांदा पोलीस ठाण्यात तीन अधिकारी व ४६ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. गणेश उत्सव कालावधीत बांदा पोलीस ठाण्याला बंदोबस्तासाठी १0 होमगार्ड देण्यात येतात. गोव्यातील पेडणे तालुका तसेच बांदा दशक्रोशीतील ३0 ते ३५ खेड्यांची बांदा ही मुख्य बाजारपेठ असल्याने बांदा बाजारपेठेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. गणेश उत्सव कालावधीत बांदा शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात कट्टा कॉर्नर चौक, नट वाचनालय, विठ्ठल मंदिर नाका, आळवाडी येथे बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत. यामुळे बाहेरुन येणाऱ्या वाहनांना बांदा शहरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. या वाहनांसाठी शहरात काही ठिकाणी 'पार्किंग स्पॉट' तयार करण्यात आले आहेत. गांधीचौक येथे सार्वजनिक गणपती असल्याने येथे देखावे पाहण्यासाठी भावीक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी कट्टा कॉर्नर, महामार्गावरील सर्कलजवळ, मच्छीमार्केट रोड-आळवाडी, बांदेश्वर नाका, गांधीचौक बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.
बांदा शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कट्टा कॉर्नर चौकात वन-वेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर देखिल कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येणार आहे.
भाविकांनी गोव्यातून मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी आंबोली घाट मार्गाचा वापर करावा यासाठी इन्सुली तपासणी नाका व कट्टा कॉर्नर चौकात पोलिसांकडून माहिती फलक लावण्यात येणार आहेत.
मद्यपी वाहनचालकांवर कडक नजर
गणेश उत्सव सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी बांदा पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सव कालावधीत गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मद्यपान करुन वाहन चालविल्याने अपघात होण्याची शक्यता असते. महामार्गावर एखादेवेळेस अपघात झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अशा वाहन चालकांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी 'ब्रेथ अॅनालायजर' मशिन तैनात ठेवण्यात आली आहे. याठिकाणी वाहनांवर सीसीटिव्ही वॉच देखिल असणार आहे. तसेच गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारु वाहतुकीवरही पोलिसांची नजर असणार आहे. यासाठी महाराष्ट्र-गोवा सीमेवर वाहतूक पोलिसांची फिरती पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे गणेश उत्सव कालावधीत अवैध दारु वाहतुकीला आळा बसणार आहे.